गोविंद पानसरे खून प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याला मिळालेल्या पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपणार असताना तपास पथकाच्या हाती काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. समीर याचे भाऊ सचिन याच्याशी वेगवेगळ्या लोकांच्या मोबाईलवरून संभाषण होत होते. एकाच मोबाईल ऐवजी वेगवेगळ्या मोबाईलवर बोलणे का होत होते, या बाजूने तपास सुरू झाला आहे. ज्या लोकांच्या मोबाईलवरून बोलणे झाले आहे अशा सांगलीतील २५ लोकांना नोटीस पाठविली गेली आहे.
सांगली येथे राहणाऱ्या गायकवाडला विशेष तपास पथकाने मागील बुधवारी अटक केली होती. न्यायालयाने त्याला ७ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर त्याला २३ सप्टेंबर रोजी पुन्हा न्यायालयामध्ये उभे केले असता पोलीस कोठडीत ३ दिवसांची वाढ करण्याचे आदेश देण्यात आले. ही मुदत उद्या शनिवारी संपत आहे. गायकवाडला शनिवारी न्यायालयात दाखल केले जाणार आहे.
दरम्यान तपास पथकाने समीर गायकवाड याचे वास्तव्य, त्याच्या संपर्कात आलेली माणसे, त्यांचे संभाषण याची सविस्तर माहिती गोळा केली आहे. समीर हा ठाणे येथे दोघा मित्रांकडे राहात होता. तो शेजाऱ्यांना आपण वर्तकनगर येथील औद्योगिक वसाहतीतील काम करत असल्याचे सांगत होता. या वास्तव काळात त्याचे भाऊ सचिन याच्याशी वारंवार बोलणे झाले आहे. मात्र, हे संभाषण २-४ मोबाईलवर न होता ते अनेक वेगवेगळ्या मोबाईलवरून झाले आहे. अशा प्रकारे नंबर बदलून हे दोघे बंधू का बोलत होते याबद्दल पोलिसांचा संशय बळावला असून त्याबाबतची सविस्तर माहिती घेतली जात आहे. शिवाय, ज्या व्यक्तींच्या मोबाईलवरून दोघांचे बोलणे झाले अशा लोकांनाही नोटीस जारी करण्यात आल्या आहेत.
गायकवाड याची पोलीस कोठडी शनिवारी संपत असतानाच पानसरे यांच्या बाजूने वकीलपत्र घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने पानसरे कुटुंबीयांनी केलेल्या आवाहनानुसार कंबर कसली आहे. गायकवाड याच्या बाजूने २१ वकिलांची फौज उभी केली असताना पानसरे समर्थनासाठीही त्याहून अधिक पटीने वकीलपत्र घेतले जाणार आहे. त्यासाठी बार असोसिएशनने वकीलपत्र सही करून देण्याचे आवाहन वकिलांना केले आहे.