जिल्ह्याला हादरून सोडणारे इस्लामपूरच्या डॉक्टर दांपत्याच्या खूनप्रकरणी रुग्णालयातील परिचारिकेसह तिघांना पोलिसांनी अटक केली असून खुनामागील कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. हे दुहेरी हत्याकांड नाजूक प्रकरणातून झाले, की आíथक कारणातून झाले हे अद्याप अस्पष्ट असून अटक करण्यात आलेल्या तिघांना २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड न्यायालयाने रविवारी मंजूर केला आहे.
इस्लामपूरच्या धरित्री हॉस्पिटलमध्ये डॉ. प्रकाश वामन कुलकर्णी व त्यांच्या पत्नी डॉ. अरुणा कुलकर्णी यांची शनिवार, दि. १९ डिसेंबरच्या मध्यरात्री हत्या करण्यात आली होती. या दुहेरी हत्येप्रकरणी रुग्णालयात काम करणारी परिचारिका सीमा यादव हिच्यासह अर्जुन पवार आणि नीलेश दिवाणजी या तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांना रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता तिघांनाही पुढील तपासकामासाठी २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दुहेरी हत्याकांडाचा हा प्रकार रविवारी सकाळी रुग्णालयात काम करणारी परिचारिका सीमा यादव डय़ुटीवर आल्यानंतर लक्षात आला होता. मात्र तीच आदल्या दिवशी डय़ुटीवर होती. संध्याकाळी कामावरून घरी जात असताना बदली आलेल्या परिचारिकेला तिने डॉक्टरांची तब्येत बरी नसल्याचे सांगत बाळंतपणासाठी रुग्ण आले तर घरी पाठविण्यास सांगितले होते. यामुळे सीमा यादव या परिचारिकेच्या हालचाली तपास करणाऱ्या संशयास्पद वाटत होत्या. तिच्या एकंदरीत वर्तनाचा अभ्यास करून रुग्णालयाबाहेरच्या वागण्याचा तपास करीत असताना तिचे नीलेश दिवाणजी या सेंट्रिंग काम करणाऱ्या तरुणाबरोबर नाजूक संबंध असल्याची माहिती मिळाली.
गेले आठ दिवस या खुनाचा उलगडा करण्यात गुंतले होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांच्याकडे तपासाची सूत्रे होती. हे हत्याकांड उघडकीस आल्यापासून सुमारे १९ जणांकडे पोलिसांनी कसून  चौकशी करून या तिघांना अटक केली असून या प्रकरणात आणखी काही संशयित असल्याचा पोलिसांचा कयास आहे. या तिघांना अटक करण्यात आल्याचे आज जाहीर करण्यात आले असले, तरी हत्येमागील कारणाचा उलगडा अद्याप पोलिसांनी केलेला नाही. मात्र हत्येमागील कारण नाजूक संबंध असल्याची समाजमाध्यमातून होत असली, तरी अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही.