शाळेची पटसंख्या पत्रके भरून जिल्हा परिषदेकडे पाठविण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी हातकणंगले तालुका पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बाबासाहेब चौगोंडा पाटील यांना दोषी धरून इचलकरंजी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. आर. जे. अस्मर यांनी २ वष्रे सक्तमजुरी व १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा मंगळवारी सुनावली. लाचखोर अधिकाऱ्यांना शिक्षा होण्याची महिनाभरातील ही दुसरी घटना आहे.
कोरोची (ता. हातकणंगले) येथे विजया मोहन यांच्या अधिपत्याखाली न्यू जनरेशन इनोवेटिव्ह इंग्लिश स्कूल चालविले जाते. ही शाळा कायम विनाअनुदानित आहे. या शाळेची पटसंख्या पत्रके भरून ती जिल्हा परिषदेकडे पाठविण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी बाबासो पाटील यांनी एक हजार रुपयांची लाच मागितली होती. २० नोव्हेंबर २००९ रोजी पंचायत समितीच्या आवारातील शिक्षक भवनाच्या पोर्चमध्ये ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाटील यांना रंगेहाथ पकडले होते. त्यांच्यावर हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्याबाबतचे दोषारोपपत्र येथील न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश अस्मर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत फिर्यादी विजया मोहन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत खटावकर, नामदेव ननावरे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक एम. डी. शिंदे या चौघा जणांच्या साक्षी तपासण्यात आल्या. सरकारी वकील सरदेसाई यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून २ वष्रे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड, तसेच कलम १३ (१) ड अनुसार २ वष्रे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. या शिक्षा एकत्रच भोगावयाच्या आहेत.