News Flash

गोकुळच्या प्रचारात जुनेच मुद्दे

गोकुळची निवडणूक ही जिल्ह्यातील तमाम राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठेची बनली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

दयानंद लिपारे

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीला धार चढली आहे. शेवटच्या टप्प्यात प्रचार सुरू असला तरी इतक्या टोकदार संघर्षाच्या प्रचारात वेगळे मुद्दे दिसत नाहीत. पूर्वीचेच मुद्दे रंगसफेदी करून हिरिरीने मांडले जात आहेत. शिळ्या कढीला ऊत आणण्याचा हा प्रकार आहे. १२ लाख लिटर इतके सर्वाधिक दूध संकलन असणाऱ्या संघाचा राष्ट्रीय पातळीवर नावीन्यपूर्ण व्यावसायिक धोरण आखून उत्कर्ष कसा साधू शकतो या मूळ मुद्द्यावर भाष्य करण्यापेक्षा आरोप – प्रत्यारोपाची धार काढण्यात दोन्ही आघाडीचे नेते समाधान मानत आहेत.

गोकुळची निवडणूक ही जिल्ह्यातील तमाम राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठेची बनली आहे. २५०० कोटीची उलाढाल असलेल्या या मलईदार संस्थेवर आपला ताबा राहावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. आपली आघाडीच कशी संस्थेचे हित साधू शकते याचा लेखाजोखा प्रचाराच्या निमित्ताने मांडला जात आहे. प्रचार म्हटले की आपली भूमिका मांडणे ओघानेच आले. मात्र यावेळी जुनेच मुद्दे प्रचाराच्या निमित्ताने उगाळले जात आहेत.

विकासाचे दावे

सत्ताधारी गटाकडून गोकुळ संघाचा गेली तीन दशके कसा उत्कर्ष केला हे आकडेवारीनिशी मतदारांच्या गळी उतरवले जात आहे. ‘जगातील बाराव्या स्थानी असलेला संघ ५ लाखावर शेतकऱ्यांची दुधाची देयके नियमितपणे देत आहे. दरवर्षी दिवाळीत १०० कोटीचा दर फरक देत असतो. ४०० कोटींच्या ठेवी आहेत,’ हा त्याच्या प्रचाराचा मुख्य आशय. विरोधी गटाकडून गोकुळमधील भ्रष्ट निष्क्रिय कारभारावर ताशेरे ओढले जात आहेत. संघाचा कारभार भ्रष्टाचार,गैरकारभार विरहित चालवला तर दुधाला अधिक रक्कम देता येणे शक्य आहे. सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांची सोन्याची भाऊबीज आनंदाने साजरी करू, असा भावनिक मुद्दा मांडला जात आहे.

बचाव आणि आक्रमण

प्रचाराची व्यूहरचना करताना सत्ताधारी गटाने बचावात्मक पवित्रा घेतला आहे. संघाच्या विकासाची सकारात्मक बाजू मांडण्यावर त्यांचा भर आहे. विरोधकांना उत्तरं द्यायची; पण ती निवडणुकीनंतर अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे नेहमी खणखणीत, दमदार भाषण करणारे महादेवराव महाडिक यांच्या भाषणात नेहमीचा आक्रमक सूर नाही. तुलनेने ही भूमिका माजी खासदार धनंजय महाडिक, त्यांच्या स्नुषा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक मांडत आहेत. विरोधकांनी महाडिक परिवाराला टीकेचे लक्ष्य केले आहे. त्यांच्या मुळे गोकुळमध्ये भ्रष्टाचाराची गंगा वाहत असल्याचे ते विविध उदाहरणांसह सभेत सांगत आहेत. महाडिकविरोधी वातावरण केले की त्याचा निवडणुकीत लाभ मिळतो, असा अनुभव असल्याने त्यांचे प्रतिस्पर्धी सतेज पाटील यांनी हाच मुद्दा प्रकर्षाने पटलावर आणण्याला महत्त्व दिले आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे संघ बहुराज्य करण्याच्या प्रयत्नावरून सत्ताधाऱ्यांवर टीकेचे आसूड ओढत आहेत.

अर्थगंगा वाहती

या निवडणुकीमध्ये गोकुळचे रक्षण आपणच करू शकतो, असा दावा सत्तारूढ आणि विरोधी गटाकडून केला जात आहे. तथापि, हा प्रचाराचा वरकरणी भाग आहे. याच्या जोडीला त्यांनी मतांची जुळवाजुळव करण्यासाठी साम – दाम नीती वापरलेली आहे. अगोदरच मतदानासाठी संस्थेचा ठरावधारक प्रतिनिधी नोंदवताना मोठी रक्कम खर्च झाली आहे. निवडणुकीचे बिगूल वाजल्यावर ठरावधारकांकडे मलई पोहचती केली आहे. तर अखेरच्या टप्प्यात वाढत्या करोना रुग्णसंख्येची पर्वा न करता ठरावधारकांना एकत्रित करून त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी निवासाची सोय करून मते फुटणार नाहीत याची विशेष दक्षता घेतली आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा तैनात केली आहे. यातून मते राखण्यासाठी दोन्हीकडून पाण्यासारखा पैसा खर्च होत असल्याने संघाच्या भवितव्याचे व्हायचे ते होवो; तूर्तास साडेतीन हजारावर ठरावधारकांच्या घरी ‘लाख’मोलाचे गोकुळ नांदत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 12:03 am

Web Title: old issues in gokul election campaign abn 97
Next Stories
1 करोना निर्बंधात ‘गोकुळ’च्या सभांची गर्दी कशी चालते
2 गोकुळ’ महाडिकमुक्त करण्यासाठी मैदानात
3 ‘गोकुळ’च्या उमेदवारीपासून बडी घराणी, नेते उपेक्षित
Just Now!
X