इमारतीच्या पाचव्या मजल्याच्या बांधकामाच्या स्लॅबचा काही भाग कोसळून लग्न समारंभासाठी आलेली वृद्धा जागीच ठार झाली, तर अन्य चौघे जण किरकोळ जखमी झाले. रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास लाड चौक येथील सुप्रभा मंच येथे ही घटना घडली. शालाबाई शांताराम िशदे (वय ६५, रा. पाडळी खुर्द तर्फ कोगे, ता. करवीर) असे मृत महिलेचे नाव आहे.
संदीप अरुण कारेकर (वय २५), युवराज वसंत भोसले (वय २२), शुभम सूर्यकांत कुंभार (वय १९), संतोष जिन्नाप्पा चौगुले (वय ३३, सर्व रा. लक्ष्मी गल्ली, पापाची तिकटी) अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, की माजी महापौर व काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांचे लाड चौक येथे घर व कार्यालय आहे. याच इमारतीमध्ये खालील बाजूस सुप्रभा मंच नावाचे मंगल कार्यालय आहे. इमारतीच्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर नवीन बांधकाम सुरू आहे. रविवारी कार्यालयामध्ये राकेश जाधव यांचे लग्नकार्य सुरू होते. जेवणाचा कार्यक्रम आटोपून राकेश जाधव यांच्या आत्या शालाबाई िशदे, शोभा लंगाटे, शशिकला मांडरे यांच्यासह संदीप कारेकर, युवराज भोसले, शुभम कुंभार, संतोष चौगुले हे कार्यालयाच्या दारातील पत्राच्या शेडखाली उभे होते. दरम्यान, इमारतीच्या पाचव्या मजल्यावर स्लॅब टाकण्याचे काम रोडच्या दुसऱ्या बाजूने सुरू होते. दुपारी २.४५वाजण्याच्या सुमारास स्लॅबच्या बीमची लाकडी फळी निसटली. यामुळे स्लॅबमधील काँक्रीट व फळी पाचव्या मजल्यावरून कार्यालयाबाहेर असणाऱ्या पत्र्याच्या शेडवर कोसळली. शेडमध्ये असणाऱ्या शालाबाई यांच्या डोक्यात पत्रा घुसला तर अन्य चार जण किरकोळ जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.
यामध्ये शालाबाई यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला. त्यांना तत्काळ रिक्षातून सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले. अपघात विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयकुमार गाढवे यांनी शालाबाई यांची तपासणी केली असता त्या मृत झाल्याचे आढळून आले. दरम्यान, अज्ञात काही जणांनी शालाबाई यांच्यावर पुढील उपचार करावयाचे असून, त्यांना खासगी रुग्णालयात न्यायचे असल्याचे सांगून शासकीय रुग्णालयात घेऊन गेले.
शालाबाई िशदे यांचा पाय दुखू लागल्याने त्या कार्यालयाबाहेरील पत्राच्या शेडमध्ये बसल्या होत्या. याचवेळी ही घटना घडली.
अज्ञातांनी मृतदेह पळविला : डॉ विजयकुमार गाढवे
शालाबाई िशदे यांची तपासणी केल्यानंतर त्या मृत झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर बी. डी. रजिस्टर भरत असताना अज्ञात २० ते २५ जणांनी शालाबाई यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयातून विनापरवानगी पळवून नेला. या बाबतची तक्रार आपण सीपीआर पोलीस ठाण्यात दिली असल्याचे डॉ. विजयकुमार गाढवे यांनी सांगितले.
पाचव्या मजल्याच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह
महापालिका क्षेत्रात लिफ्टशिवाय तीन मजले बांधण्यास परवानगी आहे, मात्र चव्हाण यांच्या घराच्या वरील बाजूस चौथ्या व पाचव्या मजल्याचे काम सुरू होते. यामुळे घटनास्थळी जमलेल्या नागरिकांतून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.