दुरुस्तीसाठी आलेल्या क्लोरीन गॅस सिलिंडरचा व्हॉल्व्ह तुटल्याने गॅस गळती होऊन वृद्धेचा मृत्यू झाला. श्रीमती लक्ष्मीबाई पांडुरंग माने (वय ६५) असे त्यांचे नाव आहे. तर गुदमरल्याने चार जणांची प्रकृती गंभीर बनली आहे. तर अग्निशामक दलाच्या पाच कर्मचाऱ्यांसह ३७ जणांवर उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. सुमारे तीनशे मीटर परिसरातील नागरिक जिवाच्या भीतीने घरातून पळून गेले. पोलिसांनी परिसरातील नागरिकांना त्वरित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या परिसरातील वाहतूकही दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली.
दुपारी पावणेदोनच्या सुमारास उद्यमनगर परिसरातील मदनलाल िधग्रा गल्लीतील एस. एस. एन्टरप्रायजेस या कारखान्यात दोन युवक क्लोरीन गॅस सििलडर व्हॉल्व्ह दुरुस्तीस आला होता. दुरुस्तीवेळी व्हॉल्व्ह अचानक तुटल्याने वायूची मोठी गळती झाली. यामुळे परिसरात पिवळय़ा रंगाचा धूर पसरला. तसेच परिसरातील सुमारे ५०हून अधिक घरातील नागरिकाना श्वसनाचा त्रास सुरू झाला, तसेच काहींना अचानक उलटय़ा होणे, घशात खवखवणे असा त्रास सुरू झाला.
घटनेचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. तीन गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी रणजित चिले यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी कृत्रिम श्वसन मास्क लावून गळती झालेल्या सििलडरवर नियंत्रण मिळविले. मात्र या पंधरा-वीस मिनिटांच्या काळात अत्यवस्थ झालेले १५ ते २० जणांना सीपीआरचे तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी लक्ष्मीबाई माने या वृद्धेला घरातून बाहेर आणण्यासाठी गेलेल्या ५ जवानांनादेखील याचा त्रास झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, आयुक्त पी. शिवशंकर यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची माहिती घेतली. तसेच सीपीआर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची विचारपूस केली.