दयानंद लिपारे

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारपासून आठवडाभर कडक टाळेबंदी लागू होत असताना रविवारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र उसळलेली प्रचंड गर्दी पाहून सोशल मीडियात ‘आता फक्त आकाश कंदील, फटाके उरले आहेत, बाकी दिवाळीचा बाजार भरात आहे,’ अशा शब्दांत खिल्ली उडवली जात होती.

करोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात सोमवारपासून आठवडाभर कडक टाळेबंदी लागू केली आहे. मात्र, जनतेकडूनच ही टाळेबंदी पायदळी तुडवली गेल्याचे चित्र आज कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र पाहायला मिळाले.

भाजी, मटण, गर्दी आणि दिवाळी

उद्यापासून श्रावण महिना सुरू होणार असल्याने मांसाहारप्रेमी कोल्हापूरकरांनी सकाळपासूनच मटण, चिकण, मासे विक्रीच्या दुकानासमोर रांगा लावल्या होत्या. तर, दुपारनंतर जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी गर्दी केली होती. भाजी मंडईमध्ये तर पाय ठेवायलाही जागा नाही असे चित्र होते. सर्वाधिक रुग्ण असलेल्या इचलकरंजी तर दिवाळीच्या बाजारासाठी गर्दी व्हावी अशी गर्दी झाली होती. त्याची छायाचित्रे पाहून सोशल मीडियात ‘आता फक्त आकाश कंदील, फटाके उरले आहेत, बाकी दिवाळीचा बाजार भरात आहे,’ अशा शब्दांत खिल्ली उडवली जात होती. कोल्हापूर शहर असो की खेडेगाव सर्वत्रच फिजिकल डिस्टंसिंगचा नियम आपणच पायदळी तुडवत आहोत, याचे कोणालाच भान उरले नव्हते.

जिल्ह्यात करोनाचे चार बळी

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांमध्ये सर्वाधिक रुग्ण असलेल्या हातकणंगले तालुक्यातील चौघांचा मृत्यू झाला. इचलकरंजीतील ५५ वर्षाची व एक ३६ वर्षांची स्त्री तर तळसंदे येथील ४८ वर्षांचा पुरुष व हुपरीतील ५२ वर्षाचा पुरुष या बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. सायंकाळपर्यंतच्या अहवालानुसार ११७ नवे करोना सकारात्मक रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील आत्तापर्यंतची करोनाबाधित रुग्णांची संख्या अडीच हजारांकडे जाताना दिसत आहे. मृत व्यक्तींचा आकडा एकूण पन्नास झाला आहे.

टाळेबंदी सवलतीत वाढ

काल फक्त दुध, औषध, वृत्तपत्र यांनाच मर्यादित वेळेत विक्रीस परवानगी होती. तर, जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी पूर्वसंध्येला काढलेल्या सुधारित आदेशानुसार बँकांची मुख्य कार्लयालये, उद्योगांमध्ये ५० टक्के कर्मचारी, दूध संकलन आणि वाहतुकीस वेळ मर्यादा नाही असा विस्तार केला आहे.