News Flash

कोयनेतून सव्वा लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग

कृष्णा, कोयना नद्यांच्या काठी पूरस्थिती गंभीर

कृष्णा-कोयना नद्यांना आलेल्या महापुरामुळे कराड येथील प्रीतिसंगम स्मारक पाण्याखाली गेले आहे.

विजय पाटील

कोयना जलग्रहण क्षेत्रातील मुसळधार पावसाचा कहर कायम असल्याने धरणाचे सहा वक्र दरवाजे १६ फुटांवर उघडण्यात येऊन कोयना नदीपात्रात १ लाख १९ हजार ७७७ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. धरणातील पाण्याची आवक विसर्ग पाण्याहून अधिक असल्याने कोयनेतील हा प्रचंड विसर्ग कायम राहणार असल्याने कृष्णा, कोयना नद्यांची पूरस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान, कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगा आदी नद्यांची पाणीपातळी झपाटय़ाने वाढून महापूरामुळे शेकडो गावे पूरबाधित झाली आहेत. हजारो कुटुंबे स्थलांतरित होताना शेतपिकासह सर्वत्र आतोनात नुकसान झाल्याचे चित्र आहे. पावसाचा जोर कायम असल्याने तुर्तास तरी पूरस्थिती निवळणे मुश्किल असल्याचे दिसते आहे. पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आपत्कालीन व्यवस्था व प्रशासनाची शिकस्त सुरू आहे. नदीकाठची जनता भेदरली असून, सर्वत्र चिंताजनक वातावरण पसरले आहे.

आज सायंकाळी ४ वाजता कोयनेचे ६ वक्र दरवाजे साडेचौदा फुटांवरून १६ फुटांपर्यंत उचलून कोयना नदीपात्रात १ लाख १९ हजार ७७७ क्युसेक जलविसर्ग सुरू केला गेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील वारणा, राधानगरी, कण्हेर, तारळी, उरमोडी, वीर, मुळशी, चासकमान, खडकवासला, पानशेत ही धरणेही काठोकाठ भरून वाहत आहेत. त्यामुळे कृष्णा-कोयना, पंचगंगा, वारणा, भीमा या नद्यांना महापूर आला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील अलमट्टी धरणातून उच्चांकी ३ लाख ६० हजार क्युसेक जलविसर्ग करण्यात येत आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर ही धरणेही काठोकाठ वाहत आहेत. या धरणांमधील जलविसर्ग जवळपास ४० हजार क्युसेक झाल्याने चंद्रभागेच्या पाण्यात झपाटय़ाने वाढ होऊन ही नदीही पूरस्थितीत वाहत आहे. या नदीवरील उजनी धरणातून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कोयनेच्या पाणलोटामध्ये गेल्या १२ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने मोठाच जोर धरल्याने धरणसाठा नियंत्रित ठेवताना कृष्णा-कोयना नद्यांकाठची पूरस्थिती अधिक गंभीर होऊ नये याची दक्षता घेण्याची शिकस्त धरण प्रशासनाने केली. परंतु, तुफान पाऊस कायम राहिल्याने त्याप्रमाणात कोयनेतून प्रचंड जलविसर्ग करणे अपरिहार्य बनल्याने पश्चिम घाट परिसरात महापुराने हाहाकार माजला आहे. आज दिवसभरात कोयनेच्या पाणलोटात जवळपास १२५ मि.मी. पाऊस झाला असून, एकूण पावसाने हंगामातील एकूण सरासरी पार केली आहे.

आज दिवसभरात कोयना, वारणा, राधानगरी, दूधगंगा, तारळी, धोम-बलकवडी, टेमघर, मुळशी, मोरणा आदी धरणक्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी कायम आहे. तुळशी  धरणक्षेत्रात सर्वाधिक १९७, कुंभीला १७५, पाटगावला १५७, राधानगरीला १५५, दुधगंगेला ६७, वारणा ४५, धोम ५२, तारळी ४५, धोमबलकवडी ९५, पवना ५७, मुळशी ३०, वरसगाव २९, टेमघर ४३, मोरणा ७० मि.मी. असा धरणक्षेत्रातील पाऊस आहे.

वाई तालुक्यातील जोर येथे सर्वाधिक १८६ मि.मी. तर, पाथरपुंजला १५७, प्रतापगडला १०२, जांभळीला १४८, वाळवणला ९७, मोळेश्वरीला ८७, भागोजीपाटलाचीवाडी ९५, रेवाचीवाडी येथे १६०, दाजीपूर व वडणगे येथे ११२, वाकीला १११, सावर्डे येथे ९७, मांडुकलीला १५८ मि.मी. असा तुफान पाऊस झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 2:39 am

Web Title: one and a half million cusecs of water from the koyna dam abn 97
Next Stories
1 सांगली, कोल्हापुरातील महापुराचा शहरांच्या दूध पुरवठय़ावर परिणाम
2 पुणे- बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक पंचगंगेच्या पुराने ठप्प
3 सांगली: कृष्णा नदीला महापूर, ८० गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती
Just Now!
X