पन्हाळा तालुक्यातील पनोरे या गावात सख्ख्या भावानेच दोन लहान भावांवर बंदुकीतून गोळ्या झाडून हल्ला चढविला.  पांडुरंग ज्ञानदेव घाग (वय ५१) हे पोटात  गोळी लागून जागीच ठार तर संभाजी  (वय ४६) हे जखमी झाले. हल्लेखोर बळवंत ज्ञानदेव घाग (५५) याला पोलिसांनी सोमवारी अटक केली असून त्याच्याकडून बंदूक व काडतूस जप्त केली आहेत.

बळवंत घाग हा एम.एस.सी.बी. मध्ये वायरमन म्हणून कार्यरत होता, तर पांडुरंग हे शेती करत होते. संभाजी यांचा उद्यमनगर येथे लेथ मशीनचा कारखाना आहे. बळवंत या मोठ्या भावाने १५ दिवसांपूर्वी गावातील एका तरुणावर चाकू हल्ला केला होता, तेव्हापासून तो फरार होता. गावातील लोकांनी कळे पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती, मात्र त्याचा भावांनी अटकपूर्व जामीन केला नाही, त्याचा बळवंत याला राग होता. बळवंत हा नेहमी मारहाण, भांडण अशा प्रकारात गुंतलेला असे. या कामी भावांनी मदत करावी अशी त्याची भावना असे. पण पांडुरंग  व संभाजी हे स्वभावाने सरळमार्गी होते . त्यांना बळवंत याचे असले उद्योग पसंत नसत. त्यातून तिघा भावांमध्ये मतभेद होते .

भावाच्या असहकार्य करण्याच्या भूमिकेमुळे चिडून असलेल्या बळवंत  रविवारी मध्यरात्री घरी गेला.  बळवंतने आपल्या जवळील  बंदुकीतून झाडलेली गोळी थेट पांडुरंगच्या पोटात घुसल्याने ते खाली कोसळले. गोळीचा आवाज आल्याने घराबाहेर पळणाऱ्या संभाजीवर  गोळी झाडली. मात्र दोघांच्यात १० फुटाचे अंतर असल्याने त्या बंदुकीतील छरे हे संभाजीच्या डोक्यात घुसल्याने  ते गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडले. हल्ल्यानंतर बळवंतने घटनास्थळावरुन पलायन केले. संभाजी याला जखमी अवस्थेत येथील रुग्णालयात उपाचरासाठी दाखल करण्यात आले आहे. कळे पोलिसांनी  बळवंत घाग याला जंगलात गाठले. त्याने बंदूक पोलीस कर्मचारी यांच्यावर रोखून त्यानाही गोळी घालीन अशी धमकी दिली.  पोलिसांनी त्याला बोलत ठेवून पाठीमागून जाऊन पकडले.

कुटुंबाची वाताहत

शीघ्रकोपी बळवंत याने केलेल्या गोळीबाराची माहिती बळवंतच्या मुलीस समजल्यानंतर ती दवाखान्यात आली.  पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता, बळवंत यास अटक करा आणि फाशी द्या, त्याने आमच्या कुटुंबाला देशोधडीला लावले असल्याचे सांगत तिने संतप्त भावना व्यक्त केली.