पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहू लागली तसा संकटांचा धोकाही वाढताना दिसत आहे. बुधवारी पाण्यात खेळणारी तीन मुले वाहून गेली असून त्यातील दोघांना वाचवण्यात यश आले. तर,  पन्हाळा मार्गावर पुरात अडकलेल्या १२ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. महापालिकेच्या आपत्कालीन पथकाने आज सकाळी ही कामगिरी पार पाडली. इचलकरंजी येथे िभत कोसळून एक यंत्रमागधारक ठार झाला.

शहरालगत असलेल्या रेडे डोह येथे बुधवारी दुपारी तीन मुले पाण्यात खेळत असताना पाण्याचा मोठा प्रवाह आल्याने ही मुले वाहून गेली.  त्यातील १ मुलगा वाहून गेला असून २ जणांना वाचवण्यात यश आले आहे.  वाहून गेलेल्या मुलाचा शोध सुरू आहे. ही माहिती कळताच अग्निशमन दलाने तातडीने हालचाली करत मदतकार्य सुरू केले. अग्निशमन दल आणि स्थानिक ग्रामस्थांनी प्रयत्न करून दोन मुलांना सुखरूप बाहेर काढले. तर वाहून गेलेल्या एका मुलाचा शोध सुरू आहे.

कोल्हापूर पन्हाळा मार्गावर पुरात अडकलेल्या १२ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. येथील आंबेवाडीनजीक एका लग्नासाठी गेलेले ५ महिला आणि ३ पुरूष अडकले होते. लग्न कार्यालयाला चारी बाजूने पुराच्या पाण्याने वेढले आहे. ही बाब लक्षात येताच येथे अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाच्या कर्मचाऱ्यांनी सर्वाना सुखरूप बाहेर काढले.

केर्ली या गावापासून पुढे काही अंतरावर असलेल्या पडवळवाडी फाटा येथे पुराच्या पाण्यात ट्रक अडकला होता. पाण्याचा अंदाज न अल्याने ट्रक रस्त्यावरून बाजूला गेला होता. या ट्रकमध्ये चालकासह चौघेजण ट्रकच्या टपावरच बसून होते. त्यांना सकाळी बाहेर काढण्यात आले.

दरम्यान  मध्यरात्री कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर पाणी आल्याने केर्ली गावाजवळ रस्त्यावरील पुराच्या पाण्यात दोन ट्रक अडकले व यामध्ये चार तरुण अडकून पडले होते. त्यांनी महापालिकेच्या नियंत्रण कक्षास दूरध्वनीवरून कळविले असता, महापालिकेच्या अग्निशमन दलाकडील जवानांनी एनडीआरएफ आणि जीवनज्योती संस्था यांच्या मदतीने पहाटे साडेपाच वाजता या चारही युवकांची सहीसलामत सुटका केली.

इचलकरंजी येथे पंचगंगा नदीला आलेल्या पूरपरिस्थितीची बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांनी पाहणी केली. सायंकाळी पाण्याने इशारा पातळी गाठली होती. मळेभागात पुराचे पाणी शिरल्याने पालिका प्रशासनाने २० कुटुंबांचे आदी व्यंकटराव विद्या मंदिर येथे स्थलांतर केले आहे. दरम्यान, पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा फज्जा उडाल्याचा प्रत्यय खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनाच आला. पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणलेली यांत्रिक बोट सुरूच न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

पंचगंगा नदी पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत चालली असून नदीवेस परिसरातील स्वामी समर्थ मंदिरालाही पाण्याचा वेढा पडला आहे. तर शेळके मळा नागरी वस्तीत पाणी शिरले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

इचलकरंजीत भिंत कोसळून एकाचा मृत्यू

इचलकरंजी येथे कारखान्याची भिंत कोसळून यंत्रमागधारकाचा मृत्यू झाला. गुरुनाथ लक्ष्मण गुंटुक(वय ५८, रा. गणेशनगर गल्ली नं. ३) असे त्याचे नाव आहे. ही घटना गणेशनगर गल्ली नं. ९ मध्ये बुधवारी घडली.

मुळचे सोलापूर येथील असलेले गुरुनाथ गुंटुक हे इचलकरंजी येथे कुटुंबासह राहण्यास आहेत. त्यांनी गल्ली नं. ९ मध्ये अब्बास अकबरअली गोटे यांच्या मालकीचा १२ यंत्रमागाचा कारखाना पाच वर्षांपासून भाडय़ाने चालविण्यास घेतला आहे. मंगळवारी गुरुनाथ हे कारखान्यात आले होते. नऊ वाजता कामगाराला सोडल्यानंतर ते स्वत रात्रपाळी करीत होते. बुधवारी सकाळी सात वाजता कामगार धनाजी सुभाष घाडगे हा तेथून जात असताना कारखान्याची िभत पडल्याचे त्याला समजले. कारखान्याचा पुढील दरवाजा बंद असल्याने त्याने पिछाडीस जाऊन पाहिले असता िभत व छत कोसळल्याचे निदर्शनास आले. मात्र गुंटुक दिसून न आल्याने त्याने याबाबतची माहिती गुंटुक यांच्या कुटुंबीयांना तसेच भागातील नागरिकांना दिली. नागरिकांनी ढिगारा उपसला. तत्पूर्वी दगड, विटा, सिमेंटचे पत्रे, लोखंडी अँगल आदीच्या ढिगाऱ्याखाली सापडून गुंटुक यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.