12 November 2019

News Flash

शाहू महाराजांच्या स्मारकाबाबत फक्त घोषणाच

शाहूंच्या भूमीत त्यांनीच उभ्या केलेल्या वैभवस्थळी मिलची भग्नावस्था शाहूप्रेमींना अस्वस्थ करीत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

दयानंद लिपारे

कोल्हापूरला आधुनिकीकरणाच्या वळणावर आणणारे राजर्षी शाहू महाराज यांनी स्थापन केलेल्या शाहू मिलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आणि मिलचे पुनरुज्जीवन करण्याचा शासनाचा निर्णय हवेत विरला आहे. या गिरणीमध्ये उत्पादन सुरू  होण्याला यंदा ११० वर्षे पूर्ण होत असताना ना उत्पादनाचा खडखडाट सुरू झाला आहे, ना स्मारक उभारण्यासाठी काही ठोस हालचाली. कोटय़वधी रुपयांचा निधी देण्याच्या घोषणा वारंवार केल्या जात असल्या तरी काहीच खर्च झालेला नाही.  शाहूंच्या भूमीत त्यांनीच उभ्या केलेल्या वैभवस्थळी मिलची भग्नावस्था शाहूप्रेमींना अस्वस्थ करीत आहे.

कोल्हापूर संस्थानाचा सर्वागीण विकास करताना शाहू महाराज यांनी व्यापक दृष्टिकोन ठेवला. कोल्हापूर व्यापार-उद्योगातही पुढे असावे यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यातून १०९६ साली ‘शाहू छत्रपती स्पिनिंग अ‍ॅण्ड विव्हिंग मिल’ स्थापन केली. १९१०-११ साली गिरणीतून उत्पादन सुरू झाले. १९१५-१६ साली गिरणी संस्थानच्या मालकीची बनली. १९२७ पर्यंत गिरणीत फक्त सुताचे उत्पादन होत असे, नंतर कापड तयार होऊ लागले. कोल्हापूरचे नाव वस्त्रोद्योगात दुमदुमू लागले. त्याला ११० वर्षे होत असताना हे सारे वैभव लुप्त झाले आहे. शासनाने या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आणि मिलचे पुनरुज्जीवन करण्याचा शासनाचा निर्णय घेतला. एका सरकारने निर्णय घेतला. त्यांनी काही घोषणा करण्यापलीकडे फारसे काही केले नाही.

आघाडी शासनाची पोकळ घोषणा

कोल्हापूर येथील छत्रपती शाहू मिलच्या २७ एकर जागेवर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला. संकल्पचित्र आराखडय़ाला उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली. स्मारक उभारताना छत्रपती शाहू महाराजांचा सामाजिक समतेचा दृष्टिकोन प्रतिबिंबित होईल, याकडे विशेष लक्ष देण्याचा आणि स्मारकाचे काम वेळेत दर्जेदारपणे व्हावे, यासाठी एका तज्ज्ञ समितीची स्थापना करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार स्मारकाचे संकल्पचित्र बनवले गेले. पण पुढे फारसे काही भरीव घडले नाही.

फडणवीस सरकारचेही प्रयत्न अपुरे

शाहू स्मारकाच्या संदर्भात युती शासनाने काहीशा हालचाली सुरू केल्या. नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी २०१६ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाप्रमाणेच राजर्षी शाहू महाराजांचे कोल्हापूर येथे भव्य स्मारक उभारण्याच्या कामास गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल.

या कामासाठी स्मारक समिती स्थापन करून त्यात स्थानिक लोकप्रतिनिधींना सामावून घेऊ. १६९ कोटींच्या प्रस्तावित स्मारकासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात दहा लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. पुरवणी मागणीद्वारे आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले.

तर गतवर्षी शाहू जयंती कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक व महिलांसाठी गारमेंट पार्क या गोष्टी विकसित करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य राहील’, अशी ग्वाही दिली. मात्र त्यातूनही पुढे काहीच हालचाल झाली नाही. आता तर कोल्हापुरात कोणताच लोकप्रतिनिधी, मंत्री, सामाजिक कार्यकर्ता, छत्रपती घराणे यापैकी कोणीच या विषयावर बोलण्यास तयार नाहीत.

राजर्षी शाहू महाराज स्मारकाची प्रतिमा बनवण्याच्या समितीमध्ये काम केले. त्यानंतर याबाबत काय केले जाणार आहे याबद्दल आम्हाला कोणीही काहीही कळवलेले नाही. सरकारचे धोरण समजत नाही. आम्ही मंडळी संशोधन, लेखन कार्यात व्यग्र असतो. शाहू महाराजांच्या जयंती वेळी साऱ्यांना जाग येते.

– जयसिंगराव पवार, शाहू चरित्र संशोधक

माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पाच एकर जागेत शाहू महाराजांचे स्मारक आणि उर्वरित जागेत गिरणी सुरू करण्याचा प्रस्ताव होता. त्यात तांत्रिक अडचणी आहेत. कोल्हापूर महापालिका, नगरविकास विभाग यांचे वेगवेगळे मुद्दे आहेत. त्यांचे स्पष्टीकरण होत नाही. विद्यमान सरकार या प्रश्नी नाही म्हणत नाही आणि काहीच करत नाही असा कटू अनुभव आहे.

– रविकांत तुपकर, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ

First Published on June 26, 2019 1:12 am

Web Title: only announcement was made about the memorial of shahu maharaj abn 97