कोल्हापूर जिल्हा ग्रंथोत्सव उद्यापासून (गुरुवार) ते शनिवारपर्यंत राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन, दसरा चौक, येथे होणार आहे. ग्रंथोत्सवाचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांनी नुकतीच दिली.
शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर, जिल्हा माहिती अधिकारी व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारपासून सुरू होणाऱ्या या ग्रंथोत्सवात गुरुवारी ग्रंथिदडीचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी प्रभावी वाचन माध्यमे या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात डॉ. विश्वनाथ शिंदे, डॉ. व्ही. एन. शिंदे, संपतराव गायकवाड, जयसिंग पाटील हे सहभागी होणार आहेत. काव्यवाचन कविवर्य गाेविंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राधानगरी उपविभागीय अधिकारी मोनिका सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत आहे.
शुक्रवारी (दि.२९) सकाळी ‘ग्रंथाने मला काय दिले?’ या विषयावरील परिसंवादामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, पोलीस उपअधीक्षक रमेश सरवदे, भालचंद्र चिकोडे वाचनालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांचा सहभाग राहणार असून यात अध्यक्ष उपजिल्हाधिकारी संजय पवार आहेत. या कार्यक्रमानंतर प्रसिध्द कथाकार प्रा. अप्पासाहेब खोत आणि  विजयराव जाधव यांचे कथाकथन होईल.
शनिवारी (दि. ३०) सकाळी वाचन संस्कृती या विषयावर स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक जॉर्ज क्रुज, प्राचार्य डॉ. प्रविण चौगले यांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजिण्यात आली आहेत. दुपारी समारोप सभारंभ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सांगता शाहीर शामराव खडके यांच्या वाचन चळवळीच्या शाहिरी पोवाडय़ाने होणार आहे.