दयानंद लिपारे

गोकुळ दूध संघासाठी संघर्षाचे रणसिंग सोमवारी फुंकण्यात आले. सत्तारूढ गटाला शह देण्यासाठी विरोधकांनी राज्यातील महाविकास आघाडीचे सूत्र अवलंबले. त्यांनी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. चार संचालक विरोधकांसोबत आल्याने सत्तारूढ गटाला सलामीलाच धक्का बसला आहे. जिल्ह््यातील बडे नेते एकत्र आल्याने आघाडीला बळ प्राप्त झाले असताना सत्तारूढ गट विरोधकांचे आव्हान मोडून काढण्यासाठी कोणती व्यूहरचना करणार हे लक्षवेधी ठरले आहे.

राज्यातील सर्वात मोठ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक चार वेळा पुढे ढकलण्यात आली. करोना संसर्ग, न्यायालयीन कामकाज यामुळे निवडणूक होणार की नाही याबद्दल शंका निर्माण झाली होती. गेल्या आठवड्यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली.

सत्तारूढ गटात प्रथमच फूट

गोकुळच्या निवडणुकीत गेली अनेक वर्ष सत्तारूढ गटापासून बाजूला जाणे म्हणजे पायावर कुºहाड मारून घेण्यातला प्रकार असे. येथे उमेदवारी मिळणे म्हणजे लॉटरी मानले जाते. यावेळी प्रथमच चौघा संचालकांनी रामराम ठोकल्याने हा सत्तारूढ गटाला धक्का आहे.  विश्वाास पाटील, अरुण डोंगळे हे दोन माजी अध्यक्ष, संस्थापक आनंदराव पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील, राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांनी विरोधी गटासोबत राहण्याचा इरादा व्यक्त केल्याने त्यांची उमेदवारी निश्चिात मानली जात आहे. ‘गोकुळमध्ये महादेवराव महाडिक व आमदार पी. एन. पाटील या नेत्यांच्या इशाऱ्यावर कामकाज चालत होते. गोकुळ बहुराज्य करण्यासह अन्य बाधक ठरणाऱ्या निर्णयाला आम्ही काही संचालक विरोध करीत होतो. त्यातून मतभेद निर्माण झाल्याने महाविकास आघाडीत आलो आहे’, असे डोंगळे यांनी स्पष्ट केले.

राज्य -जिल्हा राजकारण वेगळे

गोकुळची निवडणूक महाविकास आघाडीच्या पक्षीय माध्यमातून लढवली जाण्याची ही पहिलीच वेळ. काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना तीन पक्षासह घटक पक्ष डेरेदाखल झाले आहेत. अशावेळी आणखी एक खास वैशिष्ट्य दिसून आले. ते म्हणजे जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांची भूमिका. आमदार कोरे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला पाठिंबा दिला होता. ‘गोकुळ निवडणुकीसाठी भाजप सत्तारूढ गटासोबत असेल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे विधान ताजे असतानाच कोरे यांनी भाजपकडे पाठ करून आघाडीशी घरोबा केला आहे.

‘राज्याच्या राजकारणात मी आजही भाजपचा घटक पक्ष म्हणून सोबत आहे; उद्याही असेन. मात्र जिल्ह््याच्या राजकारणात आणि गोकुळच्या निवडणुकीत मी महाविकास आघाडीसोबत आहे. राज्याचे राजकारण आणि जिल्हा राजकारण हे यामध्ये फरक आहे’, असे कोरे यांचे म्हणणे आहे. त्यांची ही भूमिका पाहता बडे नेतेही राज्याच्या राजकारणात एक आणि स्थानिक राजकारणात दुसरी अशी दुहेरी भूमिका निभावू शकतात हेही प्रथमच घडते आहे.

विरोधक एका झेंड्याखाली

विरोधकांच्या गोकुळविरोधी कृती समितीने निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. ही निवडणूक राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या माध्यमातून लढवण्याची घोषणा महाविकास आघाडीमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आणि शिवसेनेचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व खासदार संजय मंडलिक यांनी केली. उमेदवारांची निवड ही यावेळी विरोधकांची परीक्षा ठरणार आहे.