कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महापूरग्रस्तांना केलेल्या मदतीचे कौतुक सत्ताधारी पक्ष करीत असताना सोमवारी विरोधकांनी महापुराच्या मदतकार्याच्या चुकांचा पाढा वाचत टीकास्त्र सोडले. हेलिकॉप्टरमधून शिरोळला आठ टन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्याचे सांगत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूर परिस्थिती नियंत्रणात आल्याचा दावा केला.

तर, महापुरामुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून ते पुन्हा उभारण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती हाताळण्यात सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठी आणि त्यातून निर्माण झालेल्या संतप्त परिस्थितीला सामोरे जाता येत नसल्यामुळेच बंदी आदेश लागू केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

दरम्यान, सोमवारी कोल्हापूर शहरात १ लाख २० हजार डिझेल, पेट्रोल आणि एलपीजी गॅस सिलिंडर आणण्यात आले. यामुळे इंधन आणि गॅस सिलिंडरच्या तुडवडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता चंद्रकांत पाटील यानी व्यक्त केली. पाणीपातळीत मोठय़ा प्रमाणात घट होत असल्याने जनजीवन आठवडाभरात सुरळीत होईल, असेही ते म्हणाले.

५० लाखांचे अर्थसाहाय्य – आठवले

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुराचा फटका २४९ गावांना बसला आहे. या गावांच्या पुनर्वसनासाठी केंद्र शासनानने विशेष अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. पूरग्रस्त नागरिकांसाठी खासदार फंडातून पन्नास लाख रुपये देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

बंदी आदेश तुघलकी

जयंत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री पक्षाच्या जनादेश यात्रेत तर पालकमंत्री गांभीर्य नसल्यासारखे वागत आहेत. परिणामी प्रशासनाला पूरग्रस्तांच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास प्रशासन असमर्थ आहे. त्यामुळेच बंदी आदेश लागू करण्यात आला आहे, असा टोला त्यांनी लगावला. तर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तौफिक मुल्लाणी यांनी बंदी आदेशामुळे बचावकार्याचे सामूहिक कार्य होणार नाही, अशी भीती व्यक्त करून हा शासन-प्रशासनाचा तुघलकी निर्णय असल्याची टीका केली.

आपत्ती दरपत्रक कालबा – चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सरकारी नियम आणि घोषणा बाजूला राहू देत, पूरग्रस्तांच्या खिशात किती मदत शासनाकडून येणार हे महत्त्वाचे आहे.  पूरस्थितीनंतरचा मुकाबला करण्यासाठी योग्य ती मदत मिळण्याची गरज आहे.  प्रतिव्यक्ती ६० रुपये भत्ता आणि जनावरांना १०० रुपये हे आपत्ती दरपत्रक कालबा आहे, अशी टीका करून त्यांनी ही मदत किमान दुप्पट करावी अशी मागणी केली.