न्यायालयाचा आदेश होऊनही पीडितास नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या इचलकरंजीतील विमा कंपनीची मालमत्ताच जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मात्र न्यायालयाच्या या आदेशानंतर जाग्या झालेल्या कंपनीने तातडीने संबंधितास २२ लाख ७४ हजार ६५३ रुपये इतक्या नुकसान भरपाईचा धनादेश देऊन आपल्यावरील जप्तीची नामुष्की टाळली.
येथील दत्तनगर परिसरातील संतोष पांडुरंग पाटील हे मोटारसायकलवरून जात होते. ट्रॅक्टर-ट्रेलरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते मृत झाले होते. त्यामुळे त्यांच्या वारसांनी येथील मोटार अपघात न्यायालयात दावा दाखल केला होता. या दाव्याचा निकाल २७ मार्च रोजी होऊनही युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीतर्फे नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली नव्हती. त्यामुळे ही रक्कम वसुलीसाठी मोटार अपघात न्यायालयाने संबंधित विमा कंपनीची मालमत्ता जप्ती करण्याचे आदेश दिले. ही कारवाई करण्यासाठी न्यायालयातील बेलीफ सायंकाळी ४ वाजता कंपनीच्या कार्यालयात गेले होते. मात्र जप्तीची कारवाई सुरू केल्यानंतर कंपनीच्या इचलकरंजीचे शाखा व्यवस्थापक कांबळे यांनी अर्जदार पांडुरंग आनंदा पाटील व त्यांच्या पत्नी आक्काताई पाटील यांना नुकसान भरपाईचा धनादेश दिला. त्यामुळे जप्तीची नामुष्की टाळली. यापुढे विमा कंपन्यांनी अपघातग्रस्त वारसांना नुकसान भरपाई भरण्यासाठी एकप्रकारचे मार्गदर्शनच मिळाले असल्याचे वारसाचे वकील अॅड. सी. बी. कोरे-रेंदाळकर यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 3, 2015 3:15 am