मराठा समाजातील तरुणांना नोकरी आणि शिक्षण याबाबतचे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा स्पर्धा परीक्षा केंद्र व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने गुरुवारी येथे देण्यात आला.

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबा पाटील म्हणाले, “मराठा आरक्षणाला स्थगितीनंतर स्पर्धा परीक्षेचा घाट घातला गेला आहे. यामागे कोणते अधिकारी आहेत, त्यांची नावे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी. मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडून आता जनतेशी संवाद साधला पाहिजे. त्यांनी मंगळवारपर्यंत निर्णय न घेतल्यास मातोश्रीसमोर आंदोलन करण्यात येईल.”

मराठा समाजातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न सतावत आहे. लवकरच राज्य महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा घेणार आहे. या परीक्षेसाठी मराठा समाजाच्या नेमक्‍या कोणत्या प्रवर्गातून परीक्षेला बसणार याबाबतची भूमिका स्पष्ट नाही. त्यामुळे राज्य शासनाने परीक्षा घेण्याचा प्रयत्न केल्यास परीक्षा केंद्र फोडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. शासनाने आधी आरक्षणाच्या बाबतची भूमिका स्पष्ट करावी मगच परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणीही यावेळी आबा पाटील यांनी केली.