News Flash

कोल्हापूर जिल्ह्य़ात गावनिहाय करोना चाचणी

कोल्हापूर जिल्ह्य़ात करोना संसर्ग गतीने वाढत आहे. तर मृत्युदर राज्यात सर्वाधिक आहे.

भर पावसात १५ हजारांवर तपासणी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्य़ातील करोनाग्रस्त रुग्णांचे आणि मृत्यू प्रमाण सर्वाधिक असल्याने प्रशासनाने तपासणीवर भर दिला आहे. गेले दोन दिवस सुट्टी असतानाही आरोग्य, महसूल विभागाचे अधिकारी गावनिहाय चाचणीसाठी पिंजून काढत आहेत. दोन दिवसांत पंधरा हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्य़ात करोना संसर्ग गतीने वाढत आहे. तर मृत्युदर राज्यात सर्वाधिक आहे. ही चिंताजनक परिस्थिती पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्या आठवडय़ात बैठक घेतली होती. पवार यांनी गाव निवडून सर्व ग्रामस्थांची तपासणी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार प्रशासनाने चाचण्या करण्यावर भर दिला आहे. शनिवार व रविवार हे सुट्टीचे दोन दिवस असतानाही गावोगावी तपासणी केल्या जात आहेत. रविवारी रुई, कोंडिग्रे, कबनूर, अब्दुल लाट, पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे, कागल तालुक्यातील सेनापती कापशी, चंदगड तालुक्यातील सोनारवाडी यासह अनेक गावांमध्ये तपासण्या करण्यात आल्या. कोंडिग्रेत १९४ जणांची चाचणी केली असता सर्वाचे अहवाल नकारात्मक आले. हसूर येथे ६८ जणांची तपासणी केली. त्यात कुटवाड येथील दोघे जण सकारात्मक आढळले. नांदणी येथे ८५ जणांची तपासणी केली असता तिघे जण सकारात्मक आढळले. हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव येथे २५ जणांची तपासणी केली. त्यात सात जण सकारात्मक आढळले. चंदगड तालुक्यातील किटवाड येथे १४५ जणांची तपासणी केली असता एकही सकारात्मक आढळला नाही .

प्रशासनाचे कष्ट

सुट्टी असतानाही महसूल, आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी १५ हजारहून अधिक चाचण्या केल्या. डोंगरदऱ्यांमध्ये तपासणी केल्यानंतर रेंज येऊन ऑनलाइन नोंदणी करायला दुसरा दिवस उगवतो. काही लोक चाचणीस नकार देतात. अशांना तपासणीसाठी प्रवृत्त करणे हे कौतुकास्पद आहे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी सांगितले. भर पावसात चाचणीचे काम करणाऱ्या पथकाला त्यांनी धन्यवाद दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 2:39 am

Web Title: over 15000 thousand corona test in villages of kolhapur district zws 70
Next Stories
1  ‘महानंदा‘ला सक्षम करण्यासाठी ‘गोकुळ’चा हातभार
2 कोल्हापुरातील पावसाची गती कायम; पंचगंगेच्या पातळीत तीन फुटांनी वाढ
3 कोल्हापुरात पावसाचे जोरदार आगमन
Just Now!
X