जातीच्या चौकटीत वर्षानुवर्षे स्त्रीचं अवकाश बंदिस्त केलं आहे. जात आणि स्त्री दोन्ही गोष्टींना स्वतंत्र अस्तित्व असताना जातीच्या चौकटीत स्त्रीला बंदिस्त केले आहे. हे अवकाश समजून घेऊन स्त्रीचं अस्तित्व चूल आणि मूल इतकंच मर्यादित न ठेवता तिचे मूल्यमापन तिची बुद्धी, स्वभाव आणि कर्तृत्व या परिघात व्हावे. या योगे विवेकी जोडीदार निवडण्याच्या स्त्रीच्या हक्काला समाज सन्मानाने स्वीकारेल, अशी आशावादी मांडणी अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर यांनी मंगळवारी येथे केली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शाहू स्मारक भवन येथे महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. जोडीदाराची विवेकी निवड या विषयावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
२० वर्षांपासून नरेंद्र दाभोलकर यांच्याबरोबर अंनिसचे काम करणाऱ्या सोनाली कुलकर्णी यांनी ‘विवेकी बनूया’ या विषयाद्वारे आपली जगण्यातील संवेदनशीलता रसिकांसमोर मांडली. एखाद्या व्यक्तीसाठी, त्याच्या आनंदासाठी उपासतापास करण्याच्या या त्यागाच्या खेळात फक्त आपला अहंकार सुखावला जातो, पण प्रश्न सुटत नाहीत. यासाठी त्या व्यक्तीशी संवाद साधणे आवश्यक आहे. यासाठी मन मेंदूशी प्रामाणिक राहात अंधश्रद्धांपेक्षा आयुष्यावर, माणसांवर विश्वास ठेवा, असे आपुलकीचे आवाहन कुलकर्णी यांनी केले.
आवाज ऑनर किलिंग विरोधात
नुकत्याच कोल्हापुरात इंद्रजित कुलकर्णी आणि मेधा कुलकर्णी या प्रेमी युगुलांच्या केलेल्या खूनप्रकरणी संताप व्यक्त करून दाभोलकर म्हणाल्या, जातीय अस्मिता टोकदार बनत चालल्या आहेत. प्रसंगी त्या िहसेचं रूप धारण करून समाजातील प्रेमी जिवांचा जगण्याचा हक्क संपवत आहेत. या विरोधात आवाज उठवण्यासाठी एकत्रितपणे एकत्र या असे आवाहनही त्यांनी केले. भावाच्या संतापाची बळी ठरलेली ऐश्वर्या, ऑनर कििलगचे बळी ठरलेले इंद्रजित आणि मेधा यांना श्रद्धांजली वाहून रोपटय़ाच्या रूपात त्यांच्या आठवणी जतन करण्यात आल्या.
लिंगभेदाला नकार-संविधानाचा स्वीकार या विचारधारेने काम करणाऱ्या अंनिसच्या महिला संवाद कार्यक्रमात आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळावे यासाठी दीपाली आणि रवींद्र गायकवाड, प्रीतम आणि अमोल देवडकर, ज्योती आणि अरुण भोसले या जोडप्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात आले.
मेघा पानसरे म्हणाल्या, बुद्धिमत्ता आणि भावनिकता या दोनच स्तरांवर विवेकवादाची चळवळ कास धरू शकते. यासाठीच जर आपल्याठायी संवेदनशीलता असेल तरच समाजाचे दु:ख समजू शकते. समारोपाच्या सत्रात डॉ. रेश्मा पवार आणि प्रा. सविता शेटे यांनी महिलांना व्रतवैकल्ये, आरोग्य आणि अंनिसची महिलांविषयी भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. स्वागत, प्रास्ताविक अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील स्वामी यांनी केले. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईटे, गीता हासूरकर, सुजाता म्हेत्रे आदी उपस्थित होते. आभार रमेश वडणगेकर यांनी मानले.