पी. चिदंबरम यांचा इशारा

राज्य आणि केंद्र सरकारच्या बालकांच्या आरोग्य बांधीलकीबद्दल संशय घेण्यास वाव आहे. कुटुंब कल्याण, महिला व बालविकास यांच्या निधीवाटपात सातत्याने कपात होत आहे. प्रचंड लोकसंख्येला आरोग्य देण्यात कमी पडल्यास आपणास गंभीर संकटाना तोंड द्यावे लागेल , असा इशारा माजी केंद्रीय माजी केंद्रीय गृह, वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी शनिवारी येथे दिला.

येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ डी.वाय.पाटील हॉस्पिटलच्या प्रांगणात आज उत्साहात पार पडला. या दीक्षान्त समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पी. चिदंबरम मार्गदर्शन करताना बोलत होते . अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. विजय भटकर  होते.  त्यांच्या हस्ते या वेळी  श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना डि.लीट. पदवीने, तर नवी दिल्ली येथील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे माजी अधिष्ठाता डॉ. अरुण कुमार अगरवाल यांना डीएस्सी पदवीने सन्मानित करण्यात आले. या वेळी २३०  स्नातकांना पदवी देऊन गौरविण्यात आले.

कसलेही राजकीय विधान न करता पी. चिदंबरम यांनी देशातील मूलभूत सुविधांवर भाष्य केले . ते म्हणाले, भारतासारख्या विस्तृत देशात सर्वाना पायाभूत शिक्षण देण्याबरोबरच सर्व क्षेत्रात गुणवत्तापूर्ण डॉक्टर, इंजिनिअर आणि कुशल तंत्रज्ञ निर्माण करण्याबरोबरच आरोग्य क्षेत्राची प्रगती करतांना १२ वयोगटाखालील मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त झाले आहे. संसदेकडून अन्न सुरक्षा कायदा लागू करण्यात आला. मात्र या कायद्यानुसार दिलेल्या अभिवचनाची पूर्तता होत नसल्याने राज्य व  केंद्र सरकारच्या आरोग्य बांधीलकीबद्दल संशय घेण्यास वाव आहे.

वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय नसून खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयात सेवा बजावण्याचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. त्यामुळे उदयोन्मुख डॉक्टरांनी समाजासाठी रुग्णांना मदत करण्याची भावना मनात ठेवून रुग्णसेवा करावी , असे आवाहन त्यांनी केले .

या वेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले,की मला डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून डिलीट मिळतेय ही अभिमानाची बाब आहे. महात्मा  फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. आंबेडकर यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले.  हा वारसा जपण्याचे काम केले जात आहे .