कोल्हापूर पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार बुधवारी प्रदीप देशपांडे यांनी स्वीकारला. करवीरची जनता आणि पोलिस दलातील कर्मचारी यांच्या प्रेमामुळे भारावलेले मावळते पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांचे डोळे पाणावले.
डॉ.शर्मा यांची २१ महिन्याच्या सेवेनंतर कोल्हापूर येथून बृहनमुंबई पोलिस उपायुक्तपदी बदली झाली आहे. आपल्या सेवेच्या कालावधीत त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील जनता आणि पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी यांची मने जिंकली होती. त्यामुळे शर्मा यांना निरोप देताना आज जिल्हा अधीक्षक कार्यालयातील वातावरणही भावनिक झाले होते. पोलिस दलाच्या वतीने डॉ.शर्मा यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. इतकेच नव्हे तर त्यांना निरोप देताना कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ते मुख्य मार्गापर्यंत पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी दुतर्फा उभे राहून डॉ.शर्मा यांना अनोखी सलामी दिली. हे प्रेम पाहून डॉ.शर्मा यांच्या पापण्या ओलावल्या. तिथल्या प्रत्येक व्यक्तीने मला सन्मान, प्रेम दिले. कधीही न विसरणाऱ्या आठवणी माझ्या ह्रदयाच्या कुपीत कायम राहतील. मी कोल्हापूरचा सदैव ऋणी आहे असे भावनिक उद्गारही त्यांनी काढले.
दरम्यान, पदभार स्वीकारल्यानंतर नूतन पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी डॉ.शर्मा यांनी पोलिस दलात सुरु केलेल्या विधायक उपक्रमांना पुढेही सुरु ठेवण्याचा मनोदय व्यक्त केला. गोिवद पानसरे खून प्रकरणी तपासाची माहिती घेत असून हा तपास पुढेही सुरु राहील असे त्यांनी सांगितले. कोल्हापुरातील गुन्हेगारीची पाश्र्वभूमी समजावून घेऊन त्यावर आपण भाष्य करु, असे ते म्हणाले.