आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यात शिवसेना कामाला लागली असून या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी जाहीर केले. कोल्हापूर महापालिकेतील सात नगरसेवकांची पदे जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे रद्द झाली आहेत. त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक लागल्यास सर्वच जागा शिवसेना स्वबळावर लढवील, असे संकेत त्यांनी यावेळी  दिले.

ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांच्या बठकीत ते बोलत होते. दुधवडकर म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढविणार आहे. निवडणुकीपर्यंत ज्या ठिकाणी शिवसेनेच्या शाखा नाहीत, त्या गावांत शाखा सुरू करून सभासद नोंदणी केली जाईल. लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी हे यासाठी आपापल्या पद्धतीने काम करतील. काम करताना कार्यकर्त्यांना काही अडचणी आल्यास त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगाव्यात. ते सोडविण्याचे काम संबंधित पदाधिकारी करतील. निवडणुकीपर्यंत अंगीकृत संघटना सक्षम करण्याचा प्रयत्न करून पक्षाच्या आजी-माजी आमदार, खासदारांशी संपर्क साधून त्यांचे मार्गदर्शन वेळोवेळी घ्यावे.

सध्याच्या पदाधिकाऱ्यांना काम करण्यास काही अडचणी असतील व त्यामुळे पक्षाचे काम करण्यास वेळ नसेल तर त्यांनी आताच पदमुक्त व्हावे, असा इशारा दुधवडकर यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

ते म्हणाले, पक्षबांधणीत गटप्रमुख, बूथप्रमुख यांच्या निवडी केल्या जातील.  पुढील टप्प्यात जिल्हाप्रमुख व लोकप्रतिनिधी यांची बठक घेतली जाईल. यावेळी आगामी निवडणुकीची रणनीती ठरविली जाईल. तसेच पक्षबांधणीसाठी पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये काही तात्त्विक मतभेद असतील तर ते दूर केले जातील.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, शहरप्रमुख दुग्रेश िलग्रस, शिवाजीराव जाधव, जिल्हा परिषदेचे सदस्य बाजीराव पाटील, सुजित चव्हाण, शिवाजीराव पाटील उपस्थित होते.