पावसाचा कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात अद्यापही जोर कायम आहे. मुसळधार पावसाने पंचगगा नदीची पाणी पातळी दिवसभरात तीन फुटांनी वाढली असून बुधवारी सायंकाळी ती २४ फूट ९ इंचावर येऊन पोहचली. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील २० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यावरील वाहतूक इतर मार्गावर वळवण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत गगनबावडा तालुक्यात १३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून संततधार सुरु आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस असल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे पंचगगा नदीचे पात्र विस्तारलेले असून त्यामध्ये पोहोण्यासाठी काही उत्साही तरुणांनी उड्या मारत आनंद लुटला. त्याचबरोबर मासेमारी करणाऱ्याची संख्याही वाढली.

नदीचा परिसर पुन्हा गजबताना दिसत आहे. पहिल्याच पावसात बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे नदी काठावरील गावांमध्ये आत्तापासूनच भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १३९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.