कोल्हापूर : पूरग्रस्तांना तातडीने पुरेशी मदत देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी पंचगंगा परिक्रमा यात्रेला सुरुवात केली. यात्रा नरसिंहवाडी येथे पोहोचल्यानंतर जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जुलैतील महापुराने पंचगंगा, कृष्णा खोऱ्यातील अनेक गावांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पूरग्रस्तांना पुरेशा प्रमाणात मदत देण्यात यावी, या मागणीसाठी २३ ऑगस्ट रोजी स्वभिमानीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मात्र अद्यापही पुरेशी मदत पोहोचली नाही असा आरोप करून आज शेट्टी यांनी चिखली या तीर्थक्षेत्री त्यांनी दत्त मंदिरात अभिषेक परिक्रमा यात्रेला सुरुवात केली. त्यांच्यासमवेत जालंदर पाटील, सावकार मादनाईक, सागर शंभूशेटे, वैभव कांबळे यांच्यासह कार्यकर्ते, महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाले.

त्यांनी पत्रकारांना सांगितले,की पूरग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, शेती कर्ज माफ करावे आदी मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. त्यावर मंत्र्यांनी घोषणा केल्या. पण त्यावर आमचा विश्?वास नाही. पूरग्रस्तांच्या मदतीचा शासन निर्णय जाहीर झाले पाहिजेत यासाठी हे आंदोलन केले जात आहे. नरसिंहवाडी येथे आंदोलन परिक्रमेची सांगता होणार आहे. महापुरात सर्वस्व वाहून गेले आहे. आता जगून तरी करायचे काय, असे म्हणत माझ्यासह शेकडो कार्यकर्ते कृष्णा नदीमध्ये जलसमाधी घेणार आहेत.

अशी आहे परिक्रमा

चिखली या महापूर आलेल्या गावातून सुरुवात झाली. पहिला मुक्काम शिये गावात आहे. तर चोकाक, पट्टणकोडोल, अब्दुल लाट येथे पुढचे मुक्काम असतील. आंदोलनाची सांगता नरसिंहवाडी येथे होणार आहे.