कोल्हापूर : पश्चिमेकडील भागात अजूनही पाऊस पडत असल्याने कोल्हापुरातील पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. पंचगंगा नदी सोमवारी सायंकाळी इशारा पातळीपेक्षा एक फूट अधिक वाहत होती. शिरोळमधील ४ गावातून ११२, तर करवीरमधील दोन गावातून २५९ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.  तीन दिवसापासून बंद असणारे गगनबावडा आणि आजरा येथील मार्ग सुरू झाले असून अद्यापही ९ राज्यमार्ग व १५ प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेला आठवडाभर पाऊ स पडत आहे. मुसळधार पावसामुळे कोल्हापूरला पुन्हा एकदा महापुराचा धोका निर्माण झाला आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी  इशारा पातळीकडे ओलांडली असून  सध्या ३९ फूट ११ इंच इतकी झाली आहे. इशारा पातळी ३९ फूट असून एक फू ट अधिक पाणी वाहत असून पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास धोका पातळी ४३ फूट गाठली जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

स्थलांतर सुरूच

खबरदारीचा उपाय म्हणून आजअखेर शिरोळमधील चार गावातील ११२ कुटुंबातील ४६० व्यक्तींचे, तर करवीर तालुक्यातील प्रयाग चिखलीमधील २५० कुटुंबातील ३९० आणि कोल्हापूर  शहरातील ९ कुटुंबातील २८ जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

शिरोळ तालुक्यातील गोठणपूर (कुरुंदवाड) मधील १९, राजापूरमधील ४८, राजापूरवाडीमधील १८ व खिद्रापूरमधील २७ अशा ४ गावातून ४६० व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. प्रयाग चिखली गावातील ३९० व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.  त्याचबरोबर गावातील ४५० जनावरांचेही स्थलांतर झाले आहे.

काल दिवसभरात जिल्ह्यात ३३५ मि.मी इतका पाऊ स झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाची सरासरी २५०६ मिमी, तर गेल्या २४  तासातील सरासरी २८ मिमी इतकी नोंद झाली.  राधानगरी धरणाच्या २ स्वयंचलित दरवाज्यांमधून ४२५६, अलमट्टीमधून अडीच लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील ६८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.