शहर आणि परिसरात बरसणाऱ्या पावसाने इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाटय़ाने वाढ होत चालली आहे. गेल्या २४ तासांत पाणी पातळीत ११ फुटांनी वाढ झाली असून सायंकाळी ती ५९.२ फुटावर पोहोचली होती. दुसऱ्यांदा पाणी पात्राबाहेर पडले आहे. दरम्यान, गावभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर केईएम हॉस्पिटलच्या आवारातील नीलगिरीचे झाड कोसळले. त्यामध्ये चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

रविवारपासून पावसाने थोडी-थोडी विश्रांती घेत सतत हजेरी लावली आहे. शहर आणि परिसरासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होत चालली आहे. गत महिन्याभरात झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. नद्या, तलाव, नाले, विहिरी तुडुंब भरून वाहू लागले. त्यानंतर पावसाने मध्यंतरी काही दिवस विश्रांती घेतल्याने शेती मशागतीच्या कामाला गती आली होती. तर आता तीन दिवसांपासून थांबून थांबून पाऊस हजेरी लावत आहे. धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणी साठय़ातही वाढ होत आहे. रुई बंधारा पाण्याखाली गेला असून इचलकरंजीतील पंचगंगा नदीची पातळी मंगळवारी सायंकाळी ४८ फुटावर पोहोचली होती. मंगळवारी सायंकाळी ती ५९.२ फुटावर पोहोचली होती. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

येथील गावभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर केईएम दवाखाना आवारात कंपौंडलगत असलेले निलगिरीचे झाड उन्मळून पडले. या झाडाखाली टाकवडे येथे अ‍ॅड. बी. आर. पाटील यांच्या चारचाकी वाहनाचा चक्काचूर झाला. झाड उन्मळल्याने कंपौंड भिंतीसह लोखंडी गेट निखळून पडले. झाड पडल्याचे वृत्त कळताच नागरिकांनी ते पाहण्यासाठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच महावितरण, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन तातडीने यंत्रणा राबवत झाड बाजूला केले.