दयानंद लिपारे

राज्यातील सर्वात मोठा सहकारी दूध संघ असलेल्या ‘गोकुळ’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा या वर्षीही आखाडा रंगला. गोकुळ बचाव कृती समितीच्या माध्यमातून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचे कच्चे दुवे पकडून त्यांना खिंडीत गाठताना संघाच्या कारभाराचे वाभाडे काढले. सत्ताधाऱ्यांनी गोकुळच्या प्रगतीचा आलेख वाचत सभासदांचा विश्वास संघावर असल्याचे प्रतिपादन केले. येत्या दोन महिन्यात गोकुळची संचालक मंडळाची निवडणूक होत असल्याने या निमित्ताने सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा पंचनामा करण्याची संधी विरोधकांनी साधली. मात्र त्यांनी तापवलेले वातावरण निवडणुकीपर्यंत कितपत कायम राहणार यावर निकालाचा कल अवलंबून असणार आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) स्थापनेवेळी ५०० लिटर दूध संकलन होत होते. आता प्रतिदिन दूध हाताळणी क्षमता १७ लाख लिटर आहे. याशिवाय दुग्धोत्पादनाची मूल्यवर्धित साखळी विकसित केली गेली आहे. गोकुळची ही प्रगती एकीकडे होत असताना त्याचा मलईदार कारभार हा सातत्याने वादग्रस्त बनला आहे. गोकुळमधील भ्रष्टाचाराच्या विरोधात गोकुळ बचाव कृती समितीच्यावतीने सातत्याने आवाज उठवला जात आहे. त्यातूनच काल झालेल्या गोकुळच्या सभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी उडाली. मागील सभेचे इतिवृत्त वाचण्याच्या या एकाच विषयावरून सभेत पाऊण तास आरोप-प्रत्यारोप होत राहिल्याने सभेचे रूपांतर आखाडय़ात झाले. या गोंधळाचा लाभ घेत सत्ताधाऱ्यांनी एकीकडे सभा कितीही वेळ चालू दे असे सांगताना दुसरीकडे आभार मानून सभेची सांगता केली. यामुळे विरोधकांचा सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्याचा इरादा हवेत विरला.

कारभारावर प्रश्नचिन्ह

समांतर सभेत विरोधकांनी गोकुळच्या कारभाराचा पंचनामा केला. गोकुळच्या पशुखाद्या मुळे जनावरे दगावली. पशुपालकांना दहा हजार रुपयांचे नुकसान देऊन विषयावर पडदा पाडला. विस्तारीकरणाच्या मध्ये शंभर कोटींचा गैरव्यवहार झाला. गोकुळ बहुराज्य करण्याचा विषय लपवला गेला. दूध संकलनात या वर्षी चार कोटी लिटरची घट झाल्याने संघाची पीछेहाट झाली आहे. दूध दर कमी दिला जात असल्याने पशुपालकांना ७६ कोटींचा भुर्दंड बसला आहे. युथ बँकेत विना व्याज पाच कोटी ठेवी ठेवल्या आहेत. १०० बल्क कुलरची खरेदी करूनही त्याचा वापर केला जात नाही. वाहतुकीसाठी निविदा ठरावीक लोकांनाच मिळेल अशी सोय केली जात आहे. हे सारे विषय सभेत उपस्थित करण्याची रणनीती विरोधकांची होती. यामुळे गोकुळच्या कारभाराचे धिंडवडे निघाले असते. एका नेत्याच्या आदेशावरून सभा गुंडाळली गेली, असा आरोप करीत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर यांनी पत्रकार परिषदेत गोकुळचे सर्वेसर्वा महादेवराव महाडिक यांना लक्ष्य केले. कृती समितीच्या अन्य प्रमुखांनी गोकुळच्या कारभारावर निशाणा साधला आहे. अर्थात त्यांच्या मागे पालकमंत्री गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची ताकद आहे. त्याला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचीही सोबत मिळालेली आहे. या दोघांनी गोकुळच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करावे, असे आवाहन सभेपूर्वी केल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. अर्थात यामागे गोकुळच्या सत्ताकारणाची पार्श्वभूमी असल्याचे लपून राहिलेली नाही.

प्रगतीचा महिमा

गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्या अनुपस्थितीत ज्येष्ठ संचालक, माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी अध्यक्षपद भूषवताना सभेची नौका पैलतिरी नेली. मुख्य प्रश्नाला विरोधक भिडण्यापूर्वी सभा आवरती घेण्याचा चाणाक्षपणा दाखवताना त्यांनी विरोधकांचे मुद्दे खोडून काढले. गोकुळची प्रगती होत आहे. १०० कोटी खर्चाचे विस्तारीकरण केल्याने संघाची क्षमता १५ लाख लिटर प्रतिदिन झाली आहे. दूध उत्पादकांना उच्चांकी दर दिला आहे. संघाची उलाढाल २४०० कोटींपर्यंत पोचली आहे. गोकुळचे दूध गुजरातमध्ये पोहोचले आहे. यामुळे गोकुळच्या कारभाराचा सर्वाना अभिमान वाटला पाहिजे, असे म्हणत त्यांनी सभेचा किल्ला लढवला.

सत्ताकारणाचा लढा

गतवर्षीच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील यांच्या आघाडीचा थोडक्यात पराभव झाला होता. तेव्हापासून त्यांनी गोकुळ विरोधात मोहीम उघडली असून दोन महिन्यांनंतर होणाऱ्या निवडणुकीत गोकुळवर आपला झेंडा फडकवण्याचा त्यांचा इरादा आहे. त्यांना सभेपूर्वी हसन मुश्रीफ यांची सोबत मिळाली असली तरी प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळात मुश्रीफ कोणती भूमिका घेणार यावर निकालाच्या यशाचे काटे फिरत राहणार आहेत. दोन्ही मंत्र्यांप्रमाणे सत्ताधारी गटाचे नेते महाडिक व काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील हे सभेला अनुपस्थित होते. त्यांनाही गोकुळ या निवडणुकीत संघावरील पकड ढिली होऊ द्यायची नाही. मात्र दोघा संचालकांनी स्वतंत्रपणे ठराव दाखल केल्याने आणि एका संचालकाने मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याने आलबेल स्थिती नाही. या पार्श्वभूमीवर सतेज पाटील- महादेवराव महाडिक यांच्यातील संघर्ष निर्णायक ठरणार आहे. गोकुळची रणधुमाळी गाजणार असल्याचा प्रत्यय वार्षिक सर्वसाधारण सभेत आला.