स्तनांच्या कर्करोगाबाबत सर्वसामान्य पेशींना अपाय न करता केवळ कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करणाऱ्या औषधाविषयी यशस्वी संशोधन केले असून त्याचे भारतीय पेटंट येथील दोघा शास्त्रज्ञांना प्राप्त झाले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधक डॉ. गजानन राशिनकर आणि त्यांचे विद्यार्थी डॉ. प्रकाश बनसोडे यांनी ही कामगिरी केली असल्याचे सांगण्यात आले.

भारतात महिलांमधील स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. स्तनांचा कर्करोग हा जटिल आजार आहे.

कर्करोगाच्या उपचार पद्धतींमध्ये रुग्णाला उपचारा दरम्यान होणाऱ्या दुष्परिणामांना (साईड इफेक्ट्स) सामोरे जावे लागतेम्. तसेच  कर्करोगावरील औषधांमध्ये आढळणाऱ्या प्रतिरोधामुळे (ड्रग रेजिस्टन्स) सातत्याने नवनवीन संशोधनातून विकसित केलेल्या औषधांची गरज भासत असते.  रसायनशास्त्र अधिविभागामध्ये यासंदर्भात संशोधन झाले असून त्यास पेटंट प्राप्त झाले आहे.

असे आहे संशोधन..

रुग्णांना ‘केमोथेरपी’ उपचारांदरम्यान या औषधांच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. स्तनांच्या कर्करोगावर उपयुक्त ‘टॅमॉक्सीफेन’ या औषधाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी व उपचाराची उपयुक्तता वाढविण्यासाठी ‘फेरोसीन’ हा घटक वापरून ‘फेरोसीफेन’ हे उपयुक्त औषध तयार करण्यात संशोधकांना यश आले आहेम्. फेरोसिन हा घटक मानवी शरीरास अपायकारक नाही,  हे या संशोधनातून सिद्ध झाले आहे. या चाचणीच्या अहवालात असे आढळून आले,की ही संयुगे कर्करोगाच्या पेशींना पूर्णपणे नष्ट करतात; परंतु शरीरातील सामान्य पेशींना मात्र अपाय करीत नाहीत, इतकी ती सुरक्षित आहेत.