कोल्हापूर :  कोल्हापुरातील पंचगंगा नदी धोका पातळीकडे जात असताना शहर तसेच ग्रामीण भागात पूरग्रस्तांचे स्थलांतर केले जात आहे. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीने गुरुवारी रबरी बोटद्वारा शेकडो आपद्ग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.

कोल्हापूर शहरात पंचगंगा नदी तसेच स्थानिक ओढय़ांचे पाणी नागरी भागात घुसत आहे. यामुळे काही भागांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यांचा संपर्क तुटला आहे. अनेक घरात पाणी घुसले आहे. त्यांना सुरक्षित स्थळी निघण्याच्या सूचना कोल्हापूर महापालिका प्रशासनाने केल्या आहेत. पुराचा धोका वाढू नये यासाठी या लोकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे असे प्रयत्न सुरू आहेत.

आज भर पावसामध्ये आमदार ऋतुराज पाटील, महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडी यांच्यासह अधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांची संवाद साधला. पावसाचे पाणी वाढत आहे. तत्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन आ. पाटील यांनी केले. स्थानिक आपती व्यवस्थापन समिती बरोबर ते स्वत: रबरी बोट मधून प्रवास करून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या मदतकार्यात सहभागी झाले होते. अनेकदा विनंती करून सुद्धा काही नागरिक घराबाहेर पडत नसल्याने प्रशासनाची काळजी वाढली होती.

राज्य शासन सज्ज

संभाव्य पूरस्थितीचा धोका ओळखून प्रशासनाला सतर्कतेचे आदेश शासनाने दिले आहेत. खबरदारी म्हणून कोल्हापूर शहर व शिरोळ तालुक्यासाठी एनडीआरएफच्या दोन तुकडय़ा कोल्हापूर व शिरोळ येथे दाखल झाल्या आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

धरण क्षेत्रांमध्ये पडणाऱ्या प्रचंड पावसामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांची पातळी झपाटय़ाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, पाटबंधारे विभागाचे मुख्य सचिव विजय गौतम तसेच कर्नाटक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सी. डी. पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून संभाव्य पूर परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आपण चर्चा केली असल्याचे यड्रावकर यांनी सांगितले. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील धरणांमधील पाणीसाठय़ाबाबतचे नियोजन दोन्ही राज्यांनी निश्चित केले असून या नियोजनामुळे पूरस्थिती ओढवणार नाही याची काळजी घेतली जाईल, याबाबतच्या सूचना दोन्ही राज्याचा पाटबंधारे विभागाला दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.