कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खुनाला गुरुवारी ५ वर्ष पूर्ण होत असताना पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांना अभिवादन करून तपास यंत्रणेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘कॉम्रेड पानसरे यांचा खून होऊन पाच वर्ष झाले आहेत. तपासाबाबत सरकारचे गांभिर्य जाणवत नाही. अद्यापही हल्लेखोरांना  पकडले गेले नाही. तपासाची तड लागत नाही, तोपर्यंत रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल,’ असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी यावेळी दिला.

गोविंद पानसरे व उमा पानसरे हे उभयता सकाळी फिरण्यासाठी गेले असताना त्यांच्या घराजवळच गोळ्या झाडण्यात आल्या. पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी हा हल्ला झाला होता. गोविंद पानसरे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर उमा पानसरे या गंभीर जखमी झाल्या होत्या.

या घटनेचे कोल्हापुरात तीव्र पडसाद उमटले होते. राज्यभरातून या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला होता. पानसरे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना पकडण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन झाले. तपास यंत्रणेने आत्तापर्यंत आठ जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. मात्र निश्चित निष्कर्षापर्यंत अद्याप तपास यंत्रणा पोहोचली नाही. उच्च न्यायालयाने तपासाबाबत अनेकदा ताशेरे ओढले असले तरी तपासात प्रगती झाली नाही.

मॉर्निंग वॉकचं आयोजन-

पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज येथे ‘मॉर्निंग वॉक’चे आयोजन केले होते. पानसरे यांच्यावर गोळ्या झाडलेल्या ठिकाणी कार्यकर्ते एकत्रित जमले. त्यांनी ‘गोविंद पानसरे अमर रहे, पानसरे लाल सलाम, अभिव्यक्ती स्वतंत्र जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या. खुनाचा तपास योग्य दिशेने होत नसल्याने पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी तपास यंत्रणेचा निषेध नोंदवला. उमा पानसरे, डॉ. मेघा पानसरे, दिलीप पोवार, प्राचार्य टी. एस. पाटील, अतुल दिघे, व्यंकाप्पा भोसले, उमेश सूर्यवंशी, कृष्णा स्वाती आदी उपस्थित होते.