पुस्तकाआड लपलेले अक्षरलेणे, विचारधन नव्या पिढीसमोर नेणारा शिवाजी विद्यापीठातील वाचन कट्टय़ाचा परिघ विस्तारत चालला आहे. पदरमोड करीत एकत्रित आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला शाळा-महाविद्यालयातून प्रतिसाद मिळत आहे. वाचन संस्कृती लोक पावत चालल्याची ओरड होत असताना तरुणाईने हाती घेतलेला हा उपक्रम शहर-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची ज्ञानलालसा वाढवित चालला आहे.
शिवाजी विद्यापीठातील १० माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येत वाचन कट्टा या उपक्रमाचे बीज रोवले. स्थानिक साहित्यिकांना निमंत्रित करून वाचनानंद कसा घ्यावा हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले. मानधन न घेता या कट्टय़ावर आत्तापर्यंत साहित्य अकादमी विजेते राजन गवस, डॉ. सुनीलकुमार लवटे, प्रा. चंद्रकांत नलगे, संजय पवार, सोनाली नमांगुळ, बी. एम. हेरडेकर, कृष्णात खोत, संगीता चौगुले, सुप्रिया वकील, हेमा गंगातिरकर, निलांबरी कुलकर्णी, विनोद कांबळे, प्रा. जी. पी. माळी, अनुराधा गुरव, रजनी हिरळीकर, रणवीर िशदे, बा. ग. जोशी अशा साहित्यिकांनी मानधन न घेता विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढविली आहे. प्रा. नलगे यांनी स्व-खर्चाने पुस्तके देत कट्टा चालविणाऱ्यांना प्रोत्साहित केले आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये गेली दोन वष्रे चाललेला हा उप्रकम विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच रुजत आहे. त्याला कुलगुरूंसह प्रशासनाचेही सहकार्य मिळत आहे.
वाचनाची सवय अन्य विद्यार्थ्यांमध्येही रुळावी याकडे वाचन कट्टय़ाच्या पुस्तक मित्रांनी लक्ष्य पुरविले आहे. युवराज कदम, सागर गोडसे, मेघना कावळे, सुनील यळगुडकर, वनिता पवार, संतोष वडेर, रामदास पाटील, प्रभाकर पाटील, माऊली पांढरे यांनी सुरू केलेल्या उपक्रमाला विद्यापीठाबाहेरही प्रतिसाद वाढत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जाऊन वाचन कट्टय़ाची उपयुक्तता ते करीत आहेत. वाचन कट्टय़ाची कार्यपद्धतीही विद्यार्थ्यांचा वाचनानंद वाढविणारी आहे. कट्टय़ावर एखाद्या पुस्तकाचा सारांश सांगितला जातो. त्यावर विद्यार्थ्यांना आपली मते व्यक्त करण्यास सांगितले जाते. त्यातून विद्यार्थ्यांना सामाजिक स्थिती, भाषा या विषयीचे आकलन होते.
उपक्रम सुरू करताना प्रारंभी भाषा शिकणारे विद्यार्थीच सहभागी होतील असे वाटत होते. पण आता विज्ञान, संशोधन, स्पर्धा परीक्षा या क्षेत्राचे विद्यार्थीही कट्टय़ावर अधिक संख्येने हजेरी लावत असल्याने त्यातून वाचन कट्टय़ाचे यश अधोरेखित होते. काव्य वाचन, काव्य स्पर्धा याचेही आयोजन केले जाते. हे एक मुक्त व्यासपीठ असल्याने अबोल विद्यार्थीही व्यक्त होऊ लागला आहे. येथे चूक-भूल याचे बंधन नसल्याने विद्यार्थी आपली मते स्पष्ट, निíभडपणे मांडू लागल्याने त्यांच्यात वक्तृत्वाचे गुणही रुजू लागले आहेत. यातून अबोल असणारे काही विद्यार्थी फर्डे वक्ते बनले असून आत्मविश्वास दुणावला आहे. या उपक्रमाचे महत्त्व पटल्याने शहर-ग्रामीण भागातूनही कट्टा चालविणाऱ्या विद्यार्थ्यांकडे निमंत्रणे येऊ लागली असून हे पुस्तक प्रेमी स्व-खर्चाने संबंधित महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांची वाचनाची ज्ञानलालसा वाढविण्यासाठी प्रयत्नरत आहेत.