गेल्या एक वर्षांतील कामकाज पाहता राज्यातील सरकारला ग्रेस मार्क देऊनही असंवेदनशील असल्याने फडणवीस सरकार नापास असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रसिध्दिमाध्यमांशी बोलताना सांगलीत केली. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा म्हणून मते घेणाऱ्या भाजपाने आता महाराष्ट्र कुठे आहे ते सांगावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले.
माजी मंत्री मदन पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी सांगलीत आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री यांच्यासह कुटुंबीयांची भेट घेऊन मदन पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनाने काँग्रेस एका धडाडीच्या नेत्याला मुकली असल्याचे सांगितले. त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी पक्ष राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. चव्हाण यावेळी म्हणाले की, राज्यातील फडणवीस सरकार पास तर व्हायचे राहोच, पण ते ग्रेस पासही व्हायच्या पात्रतेचे नाही. सरकारमधील घटक पक्ष सत्तेत एकत्र मात्र बाहेर एकमेकांच्या विरुध्द बोलत आहेत. सरकारच्या घटक पक्षात एकमेकांबद्दल विश्वासाचे वातावरण नाही. राज्यात दुष्काळी स्थिती अभूतपूर्व निर्माण झालेली असताना शासन केवळ वेळकाढूपणा करून सामान्य जनतेची दिशाभूल करीत आहे.
दुष्काळाने अवघा महाराष्ट्र होरपळत असताना आíथक कारणे सांगून मदत नाकारणारे शासन जिंदाल स्टील वर्क्‍सला ८५० कोटीची माफी कशी देते, असा सवाल करीत कोणतेही आíथक नियोजन न करता एलबीटी हटावसारखे निर्णय घेण्यात आले. मात्र शेतकरी आत्महत्या करीत असताना त्यांना मदतीचा हात देण्याऐवजी आíथक अडचणींचा पाढा वाचला जात आहे.
दाभोळकर, पानसरे हत्याप्रकरणी सनातनसारख्या संस्थेवर बंदीची मागणी करण्यात आली. या प्रकरणी शासन कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. साहित्यिक व विचारवंत पुरस्कार परत करीत असताना शासन केवळ संवेदनशीलतेच्या अभावामुळेच बघ्याची भूमिका पार पाडत असल्याचेही ते म्हणाले. यामुळे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात नवा दहशतवाद येऊ पाहात असून यामुळेच साहित्यिक आपले पुरस्कार परत करीत आहेत, मात्र याचे सरकारला काहीही देणे-घेणे वाटेनासे झाले आहे.
विकास कामाच्या केवळ घोषणा केल्या म्हणून कामे झाली असे म्हणता येणार नाही. मात्र विकास कामासाठी इच्छाशक्ती आवश्यक असते. ही इच्छाशक्ती सरकारकडे दिसत नाही. शासन दिशाहिन बनले असल्याने कुठे आहे महाराष्ट्र माझा अशी दुर्दैवी अवस्था झाली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची अवस्था कठीण बनली असून राज्य शासनाचा वचक राहिला आहे असे वाटत नाही.
ते पुढे म्हणाले की, आंदोलनाची स्टंटबाजी करणे हे केवळ भाजपा आणि शिवसेनेलाच जमते. काँग्रेस आपली विरोधकांचीभूमिका पार पाडत असून लोकशाही पध्दतीने आम्ही ती यथायोग्य पार पाडत राहूच. राज्यातील फडणवीस सरकार किती दिवस टिकेल याची खात्री नाही, कारण ते एकमेकांना काळे फासण्यात मग्न असून यामुळे जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.