18 November 2017

News Flash

पोलिस हवालदारास लाच घेताना अटक

पोलिस ठाण्यात चौगुले यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना गवळी याला पथकाने रंगेहाथ पकडले.

प्रतिनिधी, कोल्हापूर | Updated: August 20, 2017 2:17 AM

संग्रहित छायाचित्र

जवाहरनगर येथील एका महिलेने केलेली तक्रार तडजोड करून मिटवण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना येथे एका पोलिस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.  राजारामपुरी पोलिस ठाण्यातच हा प्रकार घडला. गवळी याच्यावर गुन्हा दाखल झाला असून, त्याच्या घराची झडती घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकाराने पोलिस दलातील लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर  आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे यांनी सांगितले की, तक्रारदार विलास मारुती चौगुले यांच्या जवाहर नगरातील मित्राच्या भावाचे परिसरातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. तरुणाने लग्नास नकार दिल्याने संबंधित तरुणीने चौगुले यांना मध्यस्थी करून लग्न जमवण्यास सांगितले. मध्यस्थी करण्यास चौगुले यांनी नकार दिला. याचा राग मनात धरून तरुणीने चौगुले यांच्या विरोधात गवळी याच्याकडे तक्रार अर्ज दिला. गवळी याने चौगुले यांना चौकशीसाठी बोलवले. तरुणीला ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार तुझ्याविरोधात दाखल केली असून हे  प्रकरण मिटवण्यासाठी १० हजार रुपये देण्याची मागणी केली .  चौगुले यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात धाव घेतली. या  विभागाच्या पथकाने राजारामपुरी पोलिस ठाण्यात चौगुले यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना गवळी याला पथकाने रंगेहाथ पकडले. यानंतर गवळीवर गुन्हा दाखल करून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या कारवाईत श्रीधर सावंत, दयानंद कडूकर, संदीप पावलेकर, आबा गुंडणके आदींनी सहभाग घेतला.

First Published on August 20, 2017 2:17 am

Web Title: police head constables arrested for for accepting bribe
टॅग Bribe