कोल्हापूर येथे पार पडणारा एक बालविवाह सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी मंगळवारी रोखला. यावेळी अल्पवयीन मुलीच्या गळ्यात वरमाला घालणाऱ्या नवरदेवासह कुटुंबियांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, नवरदेव राहुल राजुनाथ गोसावी (वय २४), त्याचे वडील राजू अशोकनाथ गोसावी, आई मनीषा राजुनाथ गोसावी (सर्व रा. नवनाथ नगर, इस्लामपूर, जि. सांगली) आणि मुलीची आई या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित अल्पवयीन मुलगी व नवरदेव राहुल गोसावी यांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मुलीच्या आईचा लग्न व प्रेम संबंधाला विरोध होता. मात्र, कुटुंबियांनी विवाह लावून दिला नसल्यास पळून जाऊन लग्न करण्याची धमकी या दोघांनी दिली होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबियांनी हे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला होता.

आज लक्षतीर्थ वसाहतीतून ‘चाईल्ड लाईन’ या संस्थेला निनावी फोन आला होता. त्यानुसार संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने हा बालविवाह रोखला. बाल संरक्षण समितीच्या आदेशानुसार १६ वर्षीय असणाऱ्या अल्पवयीन मुलीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर, चाईल्ड लाईन संस्थेच्या सुरय्या शिकलगार, अस्मिता पवार व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रणाली दुधगावकर, ज्योती भोई यांनी बालविवाह रोखण्याची कारवाई केली.