पूरग्रस्तांना सावरण्यासाठी राज्य शासनाने मदत व पुनर्वसनाचे काम सुरू केले असून,  त्यासाठी केंद्र शासनाकडे मदतीची मागणी केली असतानाच राज्य शासनाकडून मिळणारी मदत आणि केंद्राकडे केलेली मागणी यावरून राजकीय लाटा वाहू लागल्या आहेत. पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात शासन कमी पडणार नाही, असे सत्ताधारी नेतेमंडळी सांगत आहेत. तर, मदत व पुनर्वसनाच्या कामात सरकार अपयशी ठरल्याची टीका करीत राज्य शासनाची मदत तोकडी असून केंद्र शासनाकडे नुकसानीच्या प्रमाणात कमी प्रमाणात मागणी केल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. महापुरात किती नुकसान झाले आहे याचा पंचनामा करण्याचे काम गतीने सुरू आहे. मात्र हे काम पूर्ण होण्यास महिन्याभराचा कालावधी लागणार असल्याने तोवर आकडेमोडीचे राजकारण आणखीनच उसळ्या घेण्याची चिन्हे आहेत.

कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या बाबतीत शिवसेनेने २००० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली आहे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ८ हजार कोटीहून अधिक नुकसान कोल्हापूर-सांगली जिल्ह्य़ात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. याचवेळी शेतीच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीवरूनही विरोधकांनी रान उठवण्यास सुरुवात केली आहे.

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिली होती. ऑगष्ट महिन्यात मात्र मुसळधार पावसाने राज्याच्या पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ भागाची दैना उडाली. सांगली आणि कोल्हापुरातल्या २२३ गावांना महापुराचा फटका बसला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुण्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे ४० जणांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता आहेत. शेती, घर, व्यापार, उद्योग आदी घटकांचे अतोनात नुकसान झाले आहे.  पूरग्रस्तांना दिली जाणारी मदत, राज्य शासन करीत असलेली मदत, राज्य शासनाने केंद्राकडे मागितलेली मदत आदी मुद्दय़ांवरून वादाला तोंड फुटले आहे.

महापुराने दैना

पश्चिम महाराष्ट्रातील या भागाची महापुराने अक्षरश: दैना उडवली आहे. सर्वाधिक नुकसान शेतीचे झाले आहे. उसाचा गोडवा गायब झाला असून कोल्हापूर परिसरात ५० हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आल्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.  सोयाबीन, कडधान्य, भुईमूग, भाजीपाला आदी पिकांनाही जलसमाधी मिळाली आहे. एकूण किती क्षेत्र पूर्णत: खराब झाले आहे, किती ठिकाणी दुबार पेरणी करावी लागणार आहे, याचा पुरता अंदाज अद्याप आलेला नाही. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सेवकांमार्फत पंचनामे करण्यात व्यग्र आहेत. नदीकाठच्या शेतातील पाणी पूर्णत: ओसरायला २-३ आठवडे लागतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. २ लाख हेक्टर पिके उद्ध्वस्त झाली असल्याचा अंदाज शेतकरी संघटना व्यक्त करीत आहेत. याशिवाय, घर, व्यापार, उद्योग आदींचे नुकसान झाल्याचा आकडा समजण्यास दोन आठवडे लागतील. सुमारे दीड लाख घरांना फटका बसला आहे. १५ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. २००५ सालच्या महापुरापेक्षा यंदाच्या महापुराची तीव्रता अधिक असल्याने साहजिकच नुकसानीचे आकडेच डोळे पांढरे करणारे आहेत. नुकसानीचा आकडाही वाढण्याची चिन्हे आहेत. हा आकडा किती यावरून राजकीय मशागत सुरू झाली आहे.

विरोधकांत एकवाक्यतेचा अभाव

महापूरग्रस्तांना मदत करण्यात शासन अपुरे ठरत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. महापूर निवारणासाठी केंद्र शासनाकडे केलेली अर्थसाहाय्याची मागणी तोकडी असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, विजय वडेट्टीवर यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे माजी जलसंपदामंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्य़ात पिकांचे २० हजार कोटी, व्यापाराचे ५ हजार कोटी नुकसान झाले असून घरांच्या नुकसानीचा अद्याप अंदाज नाही, असे ‘लोकसत्ता’ला सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्य़ात उसाचे ३ हजार, भाताचे २०० कोटी, सोयाबीनचे १०० यासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय, शेतातून खराब झालेले पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांना कोटय़वधी रुपयांचा खर्च येणार असल्याचे म्हटले आहे. तर, शरद पवार यांनी कोल्हापुरात बोलताना राज्य शासनाची मागणी योग्य की अयोग्य यावर भाष्य न करता महापूर निवारणासाठी राज्य शासनाने कर्ज काढावे असा सल्ला दिला आहे. त्यामुळे ही आकडेमोड दिवस सरतील तसे वेगळे स्वरूप धारण करण्याची आणि त्यावरून राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

पुनर्वसनासाठी सर्वतोपरी मदत -मुख्यमंत्री

नुकसानीचा पूर्ण अंदाज येण्यापूर्वीच राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पैशाची मागणी केली गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा हजार आठशे कोटी रुपये मदत मागणार असल्याचे सांगितले आहे. याचवेळी त्यांनी मदत-पुनर्वसनासाठी निधी कमी पडणार नाही, असे स्पष्टीकरण केले आहे. त्यानंतरही विरोधकांनी शासनाला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. या आकडेमोडीच्या टीकाटिप्पणीकडे लक्ष न देता भाजपने पूरग्रस्तांचे समर्थपणे पुनर्वसन केले जाईल, असे गावोगावच्या दौऱ्यात सांगण्यास सुरुवात केली आहे.

दोन हजार कोटींचे नुकसान -मंडलिक

शिवसेनेने एकीकडे पूरग्रस्तांना राज्यातून मदत मिळवून देण्याचे काम चालवले असताना त्यांना मोठा आर्थिक आधार देण्याची गरज व्यक्त केली आहे. कोल्हापूर, सांगली परिसरात थैमान घातलेल्या महापुरात सुमारे २ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची भीती खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली रोख रकमेची प्राथमिक मदत अपुरी पडण्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. मंडलिक यांनी राज्याच्या अर्थमंत्र्यांनी तातडीने ५०० कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी केली आहे.