दयानंद लिपारे, कोल्हापूर

खासदार व्हायचंय? जिल्हा परिषद सदस्य व्हा! कोल्हापुरात खासदार होण्याचे महाद्वार जिल्हा परिषदेतून उघडते. गेल्या अनेक वर्षांचा इतिहास हेच सांगतो. आजवर अनेकांनी ‘जिल्हा परिषद ते संसद’ अशी चढत्या भाजणीची वाटचाल केली आहे. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या दिमाखदार विजयाने या इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत विजयी व्हायचे असेल, तर ग्रामीण भागाचा कौल निर्णायक असतो. ग्रामीण पाश्र्वभूमी असलेल्या मतदार संघात तर हे चित्र प्रकर्षांने दिसून येते. ग्रामीण भागातून राजकारणाचा श्रीगणेशा केलेल्या अनेकांनी पुढच्या राजकीय प्रवासात मोठी मजल मारली आहे. जिल्हा परिषद हे त्यातील महत्त्वाचे पाऊ ल. येथे आल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणाच्या नाडय़ा कळण्यास मोठी मदत होते  जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे नेमके प्रश्न, राजकीय परिस्थिती, गटातटाचे राजकारण याचे अचूक आकलन होते. एकमेकांशी वाढणाऱ्या संवाद-सहकार्यातून पुढे राजकीय प्रवासाला परस्परांचे सहकार्य मिळत राहते. त्यामुळे जिल्हा परिषदेत प्रभाव पाडलेल्या अनेकांना राजकारणाचे पुढचे दरवाजे उघडे होतात. अगदी दिल्ली वारीही घडते. कोल्हापुरात अनेकांचा राजकीय भाग्योदय याच पायरीपासून झाला आहे.

 एकाच वेळी दोन खासदार

ताजे उदाहरण मंडलिक आणि माने. काँग्रेसचे सदस्य म्हणून संजय मंडलिक यांनी जिल्हा परिषदेत प्रवेश केला आणि अध्यक्षपदही मिळवले. तेव्हा, अमल महाडिक यांना अध्यक्षपदी विराजमान करण्याचा प्रयत्न महादेवराव महाडिक यांनी केला. मात्र, तत्कालीन गृह राज्य मंत्री सतेज पाटील यांनी तो हाणून पाडला. आता अमल  महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक या भाजपच्या चिन्हावर निवडून येऊ न अध्यक्ष बनल्या. धैर्यशील माने यांनी तर रुकडी या हातकणंगले तालुक्यातील मूळ गावात ग्राम पंचायत सदस्य म्हणून राजकारणात पहिले पाऊ ल टाकले. पुढे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोनदा जिल्हा परिषद सदस्य बनले. तेथे उपाध्यक्ष म्हणून प्रभावी काम केले. धैर्यशील माने यांनी घराण्यात तिसरी खासदारकी ओढून आणली असली, तरी माने घराण्याच्या राजकारणाचा आरंभ हा जिल्हा परिषदेतून झाला. त्यांचे आजोबा बाळासाहेब माने अध्यक्ष होते.

बाळासाहेब माने, मंडलिक आणि शेट्टीही

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कामगिरीवर बाळासाहेब माने खासदार बनले. सलग पाच वेळा त्यांनी यशाची कमान उंचावत ठेवली. सदाशिवराव मंडलिक यांच्या राजकारणाच्या प्रवासात जिल्हा परिषद हा महत्त्वाचा टप्पा होता. राज्यात मंत्री, चार वेळा खासदार अशी प्रगती मंडलिक साधली होती. इतकेच काय तर पराभूत झालेले राजू शेट्टी जिल्हा परिषद सदस्य म्हणून पुढे आले. हा अनुभव त्यांना ‘शिवार ते संसद’ इथंपर्यंत नेण्यास कारणीभूत ठरला.