सतेज पाटील यांच्या मागणीवर धनंजय महाडिक संतप्त

आगामी निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित लढण्याचे ठरले असताना जागावाटप हा कळीचा मुद्दा बनणार असल्याचे दिसू लागले आहे. काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या पहिल्याच दिवशी याची झलक कोल्हापुरात पाहायला मिळाली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असताना काँग्रेसचे स्थानिक आमदार सतेज पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी हा मतदारसंघ काँग्रेसला मिळाला पाहिजे, अशी आग्रही मागणी पक्षनेत्यांकडे  केली आहे. त्याला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

यामुळे या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांचा तिळपापड  झाला. त्यांनी पक्षनेते शरद पवार यांच्याकडून उमेदवारी मिळण्याची पूर्ण शक्यता असताना काँग्रेसने केलेली मागणी अनाठायी असल्याचे सांगत सतेज पाटील यांच्यावर ‘मनोरुग्ण’ अशी टीका केली आहे. यामुळे काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांना तोंड फुटले आहे.

आगामी लोकसभा निवडणुका काँग्रेस – राष्ट्रवादीने एकजुटीने लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जागावाटपाच्या उभयपक्षी बैठकाही सुरु झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात वातावरण खेळीमेळीचे असल्याचे दिसत असताना कोल्हापूरच्या जागावाटपाच्या वादाने उचल खाल्ली असल्याने आघाडीत बिघाडी होईल का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा कोल्हापुरातून सुरु झाली. या वेळी राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसच्या नेत्यांनी आपला दावा सांगितला आहे. संघर्ष यात्रेच्या पहिल्या दिवशीच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळायला पाहिजे, असे म्हणत पुणे जिल्ह्यतील नेत्याने कोल्हापुरातील जागावाटपावर भाष्य केले.  त्यानंतर रात्री झालेल्या जाहीर सभेत सतेज पाटील यांनीही हातकणंगले मतदारसंघ राष्ट्रवादीकडे दिला जावा आणि कोल्हापूर काँग्रेसकडेच आले पाहिजे, अशी मागणी करून येथील कॉंग्रेसचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपण स्वत: घेत असल्याचे सांगितले. ही मागणी करत सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना खासदारकीच्या मार्गातून बाजूला काढण्याची खेळी सुरु केल्याचे स्पष्टपणे दिसून आले. या वेळी  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांच्या मागणीचा पक्ष आदर करतो, पण अद्याप जागावाटप झालेले  नाही. त्यामुळे केलेला दावा योग्यच असल्याचेसांगत अप्रत्यक्षपणे या मागणीचे समर्थन केले.

आघाडीपूर्वीच कुरघोडय़ा

काँग्रेसच्या या मागणीनंतर सुरुवातीला खासदार धनंजय महाडिक यांना त्याचे गांभीर्य समजले नाही. पण, आपल्या दिल्लीच्या मार्गात धोंड उभी राहत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी काँग्रेसवर विशेषत: सतेज पाटील यांच्यावर तोफ डागली. धनंजय महाडिक (मुन्ना) आणि  सतेज पाटील( बंटी) यांच्यातील मैत्री सर्वश्रुत होती, तसेच आता टोकाचे राजकीय वैरत्व सर्वपरिचित झाले आहे. त्यामुळे महाडिक यांनी सतेज पाटील यांना कोल्हापूरची जनता त्यांना ‘सूर्याजी पिसाळ’ म्हणून ओळखत असल्याची कडवट टीका केली आहे. आपल्या पाठीशी पक्षनेते शरद पवार ठामपणे उभे आहेत, त्यांच्या आशीर्वादाने खासदार म्हणून प्रभावी कामगिरी केली असल्याने लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणारही, असे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक पातळीवर खासदार आणि आमदार यांच्यात कुरघोडी सुरु असली तरी पडद्याआडून आणखीही काही महत्त्वाचे नेते सूत्रे हलवत असल्याने हा विषय इतक्यात न थांबता त्याचे जिल्ह्यच्या राजकारणावर दूरगामी परिणाम संभवत आहेत. याचवेळी हा संदर्भ घेऊ न राज्यात अनेक ठिकाणच्या मतदारसंघात अशाप्रकारच्या वादाला खतपाणी मिळून उभय काँग्रेसच्या चर्चेत अडथळा निर्माण होऊ न नेत्यांची डोकेदुखी वाढणार असेच दिसत आहे.