कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करोनाचा संसर्ग वाढत चालला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पुढील दहा दिवस जिल्ह्यात टाळेबंदी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, माजी खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. तर दुसरीकडे पालकंमत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरात टाळेबंदीची गरज नसल्याची भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात हे पहावे लागणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून करोनाच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय महाडिक यांनी दहा दिवसांसाठी कडक टाळेबंदी जाहीर करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात समूह संसर्गाचा धोका उद्भवू नये, करोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी टाळेबंदी जाहीर करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

करोनाचे राजकीय कंगोरे?

पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यात कडक टाळेबंदीची गरज नाही असे विधान काल केल्यानंतर आज महाडिक यांनी त्या उलट मागणी केली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या या दोन्ही कारभाऱ्यांच्या परस्परविरोधी भूमिका या राजकीय प्रभावाने प्रेरित आहेत काय? असा प्रश्नही उपस्थित होतो आहे.