दयानंद लिपारे

कोल्हापूर जिल्ह्य़ाचे राजकारण भल्याभल्यांना समजणे कठीण जाते. कोणत्या पक्षातील कोण कधी कोणाबरोबर जाईल याची शाश्वती नसते. आताही गोकुळ आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या भविष्यात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे.

टीका करताच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आरोप करणाऱ्यावर दहा कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे प्रत्युत्तर आलेच म्हणून समजावे. अशी मुश्रीफ यांची भूमिका असताना आता त्यांच्याच ‘सरसेनापती संताजी घोरपडे’ या खासगी साखर कारखान्यांमध्ये वजन काटय़ामध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केला आहे. इतका मोठा होऊनदेखील मुश्रीफ यांनी मौन बाळगल्याने त्याचे वेगवेगळे अन्वयार्थ लावला जात आहेत.

कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या राजकारणामध्ये हसन मुश्रीफ आणि महाडिक परिवार यांचे कधी जमते तर कधी बिनसते. गेल्या वेळी गोकुळ दूध संघाची निवडणूक मुश्रीफ यांच्या सहकार्यामुळेच महाडिक यांना जिंकता आली. अगदी लोकसभा निवडणुकीतही मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार धनंजय महाडिक यांचा प्रचार केला होता. असे सलोख्याचे संबंध असतानाही आता महाडिक यांनी मुश्रीफ यांच्या साखर कारखान्याला वजनकाटय़ातून लक्ष्य केले आहे.

साखर कारखानदारीतील काटेमारी हा नेहमी विषय वादग्रस्त ठरत आला आहे. अनेक साखर कारखान्यांच्या वजनात काटामारी होत असल्याने शेतकरी संघटनानी स्वतंत्र काटे उभा करण्याचा निर्णयही घेतला होता. महाडिक यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करताना नेमका मुश्रीफ यांच्याच कारखान्याचा उल्लेख का केला, असा मुद्दा चर्चेत आला आहे. एक तर या कारखान्यांतील काटय़ामध्ये काळेबेरे असावे. त्यावरून हा  विषय ताणू नये असे मुश्रीफ यांना वाटत असावे. कारण गेल्या वर्षी या कारखान्यातील प्रदूषणाच्या विषयावरून स्थानिक नागरिकांनी दूषित पाण्याच्या घागरी मुश्रीफ यांच्या अंगावर ओतून राग व्यक्त केला होता. आता काटेमारीचा विषय उपस्थित झाला आहे. गेल्या आठवडय़ात हसन मुश्रीफ व त्यांचे पुत्र नाविद मुश्रीफ यांनी घोरपडे साखर कारखान्याच्या ३०० कोटींचे विस्तारीकरण करणार असल्याचे घोषित केले होते. तसेच एफआरपीशिवाय ५० रुपये गणेश उत्सव तर ५० रुपये दसरा- दिवाळीत देणार असल्याचे घोषित केल्याने कारखान्याचे प्रतिमा उंचावली होती. पण महाडिक यांनी संशय व्यक्त केल्याने कारखाना आणि मुश्रीफ यांच्याविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्हा बँकेचे राजकारण

तीन महिन्यांची मुदत संपली की गोकुळ व पाठोपाठ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक अपेक्षित आहे. महाडिक यांच्या दृष्टीने गोकुळ हा जीव की प्राण. तर मुश्रीफ यांच्या राजकारणाचे केंद्रस्थान जिल्हा बँक आहे. त्यामुळे या दोघांमध्ये यात साटेलोटे होण्याची शक्यता आहे. मुश्रीफ जिल्हा बँकेवरील पकड सुटू नये, या प्रयत्नात असून त्याकरिता महाडिक यांची ताकद उपयोगाची ठरणार आहे. पण गोकुळ दूध संघाबाबत अलीकडच्या काळात मुश्रीफ यांनी ग्रामविकासमंत्री सतेज पाटील व खासदार संजय मंडलिक यांच्याबरोबरीने गैरव्यवहाराविरुद्ध बोलताना दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीत मुश्रीफ यांनी महाडिक यांच्या बाजूने प्रचार केला होता. कागल तालुक्यात मंडलिक यांना एकतर्फी मिळालेली मते पाहाता तालुक्यातील सर्वच नेते हे मंडलिक यांच्या बाजूने होते हे उघड झाले होते. प्रत्यक्षातील राजकारण आणि पडद्यामागील राजकारण हे वेगळेच असते, वेगळेच असल्याचे कोल्हापूरकरांनी अनुभवले असल्याने गोकुळ व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकारणात नेमके कोण कोणासोबत राहते हे लक्षवेधी बनले आहे.