इचलकरंजी शहराला शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या नावाखाली विविध योजना आणण्याच्या नावाखाली नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा उद्योग लोकप्रतिनिधींकडून सध्या सुरू आहे. काळम्मावाडी, वारणा किंवा दूधगंगा या योजनांची चर्चा होत असली तरी या तिन्ही योजना अव्यवहार्य, आíथक अपव्ययाच्या आणि मनुष्यबळ वाया घालवणाऱ्या आहेत. त्यामुळे पाण्याच्या प्रश्नावर राजकारण करत या तिन्हीपकी कोणतीही योजना राबवण्याचा प्रयत्न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन त्याला तीव्र विरोध करू. प्रसंगी उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करू, असा इशारा अ‍ॅड. धर्यशील सुतार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले, इचलकरंजी शहरालगत असलेली पंचगंगा नदी प्रदूषित बनल्याने कोटय़वधी रुपये खर्च करून कृष्णा नळपाणी योजना आणण्यात आली. प्रत्यक्षात पंचगंगा नदी जेथे कृष्णा नदीला मिळते त्या ठिकाणापासूनच पाणी उपसा केला जातो. त्यामुळे इचलकरंजीला पंचगंगेचे प्रदूषित पाणीच मिळत आहे. तसेच या योजनेतून उपसा केल्या जाणाऱ्या पाण्यापकी बहुतांश पाण्याची गळती होते. मात्र ती थांबवण्यासाठी कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाहीत.
शुद्ध पाणी पुरवठय़ासाठी निरी समितीने अन्य योजना राबवण्यापेक्षा नृसिंहवाडीतील दत्त मंदिराच्या उत्तरेच्या बाजूस कृष्णा नदीतूनच पाणी उपसा करण्याचा सल्ला दिला असल्याचे नमूद करून अ‍ॅड्. सुतार म्हणाले, शहराला शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या नावाखाली अन्य योजना राबवणे म्हणजे नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. कायमस्वरूपी शुद्ध पाण्यासाठी राजकारण न करता लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. नदी प्रदूषण मुक्तीचा खर्चही काळम्मवाडी-वारणा-दूधगंगा या योजनांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे या तिन्हीपकी कोणतीही योजना नगरपालिकेकडून राबवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला कडाडून विरोध राहील, असे सांगितले. यावेळी इचलकरंजी नागरिक मंचचे दिलीप माणगावकर, अभिजित पटवा, प्रसाद दामले, इराण्णा सिंहासने आदी उपस्थित होते.