कोल्हापूर : इचलकरंजीतील पॉपलीन कापड उत्पादन करणे परवडत नसल्याने परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत कारखाने बंद ठेवणेचा निर्णय बुधवारी एका बैठकीत घेण्यात आला. इचलकरंजीसह भिवंडी, मालेगांव व विटा या ठिकाणच्या यंत्रमाग संघटनांच्या पदाधीकाऱ्यांबरोबर याप्रश्नी समन्वय ठेवण्यासाठी बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनमध्ये झालेल्या बैठकीत यंत्रमागधारकांनी एकमताने घेतला. पॉपलीन उत्पादक संघाचे कैश बागवान, दिलीप ढोकळे, श्रीशैल कित्तुरे, सुनील पाटील, तुकाराम सावंत, पॉवरलुम असोसिएशनचे संचालक चंद्रकांत पाटील, प्रमोद महाजन, सोमा वाळकुंजे, राजेंद्र राशिनकर, आनंदा होगाडे, तुकाराम साळुंखे, रामा होगाडे, नंदू कांबळे उपस्थित होते.
गेल्या ४ महिन्यांपासून पॉपलीन कापड हे उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने विकले जात आहे. सुताचे दर दररोज वाढत आहेत. त्याचबरोबर कापडाला मागणी नसल्यामुळे २५ जूनपासून पॉपलीन कापडाची परिस्थिती सुधारेपर्यंत इचलकरंजीतील पॉपलीन यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय झाला. या बंदमुळे इचलकरंजीतील सुमारे १० हजार यंत्रमागावर अंदाजे दिवसाला १५ लाख मीटरचे कापड उत्पादन बंद होऊन जवळपास महिन्यास १०० कोटींचे उत्पादन थांबणार आहे.