इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून विजयी झालेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी गुरुवारी भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी आपला पाठिंबा दिला. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार आवाडे यांनी जिल्ह्यतील सर्वाधिक मताधिक्य घेत बाजी मारत भाजपचे सुरेश हाळवणकर यांचा ४९ हजारच्या मताधिक्याने पराभव केला. त्यामुळे पुढील राजकीय प्रवासात ते कोणती भूमिका घेणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले होते.

 सेना ते वर्षां

निवडणुकीपूर्वी पासूनच आवाडे हे शिवसेनेत सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली होती. तर निकालानंतर ते निश्चितपणे शिवसेनेत प्रवेश करणार असे बोलले जात होते. राज्यात सरकार स्थापनेसाठी वेगाने हालचाली सुरू असताना गुरुवारी दुपारी आवाडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही त्यांनी पाठिंबा देत असल्याचे पत्र दिले आहे. याबाबत आवाडे म्हणाले, कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांची मते आजमावून घेतली. त्यांना आपला निर्णय मान्य आहे असे सांगितले. मतदार संघातील विकासकामे गतीने होण्यासाठी फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पत्र दिले आहे.