18 October 2019

News Flash

कोल्हापुरात नवरात्रोत्सवाची तयारी; महालक्ष्मी मंदिराची स्वच्छता

मंदिरातील गाभाऱ्यासह महालक्ष्मी  प्रदक्षिणा मार्ग, खजिना, मातृलिंग स्थानासह संपूर्ण मंदिरातील धूळ हटवण्याचे काम केले जात आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या मंदिराची स्वच्छता सुरू झाली असून सोन्याच्या दागिन्यांनाही मंगळवारी चकाकी देण्यात आली.

दक्षिण काशी कोल्हापुरात नवरात्री उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या प्राचीनकालीनसह सध्याच्या वापरात असलेल्या सोन्याच्या दागिन्यांना मंगळवारी सफाई करून पॉलिश करण्यात आले. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराचीही स्वच्छता आता युद्धपातळीवर सुरू आहे.

महालक्ष्मीच्या अलंकारांमध्ये शिवकालीन मोहराच्या माळा, पालखी, चौरी मोरचेल, मानदंड, गदा, चंद्रहार, ठुशी, कर्ण कुंडले, किरीट, पादुका, मंगळसूत्र आदींसह जडावाच्या दागिन्यांचा समवेश आहे. मंदिराचे पारंपरिक हवालदार महेश खांडेकर व मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्या देखरेखीखाली गरुड मंडपात दागिन्यांना पॉलिश करण्यात आले. बुधवारी महालक्ष्मीच्या चांदीच्या दागिन्यांना पॉलिश केले जाणार आहे.

मंदिराची सफाई देखील युद्धपातळीवर आहे. नवरात्रोत्सवासाठी महालक्ष्मी मंदिर स्वच्छतसेाठी मुंबईहून विना मोबदला कोल्हापुरात दाखल झालेल्या संजय मेटनन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मंदिराच्या व्हरांडय़ातील दीपमाळेची स्वच्छता केली.

या कामासाठी १४ जादा कर्मचारी आले आहेत. मंदिरातील गाभाऱ्यासह महालक्ष्मी  प्रदक्षिणा मार्ग, खजिना, मातृलिंग स्थानासह संपूर्ण मंदिरातील धूळ हटवण्याचे काम केले जात आहे.

पावसापासून संरक्षण

उत्सवासाठी मंदिराच्या पूर्व दरवाजापासून ते जुना राजवाडा पोलीस ठाण्यापर्यंतच्या हद्दीत घालण्यात येत असलेल्या दर्शन दंडपाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच मंदिराच्या व्हरांडय़ातील विविध धार्मिक कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी उभारण्यात येत असलेल्या मंडपाचेही काम पूर्ण करण्यात आले आहे. पावसाचा फटका भाविकांना बसू नये म्हणून दोन्ही मंडपांवर पत्रे घालण्यात आले आहेत.

 

First Published on September 25, 2019 1:27 am

Web Title: preparation for navratri festival in kolhapur abn 97