दयानंद लिपारे

करोना विषाणूच्या संकटामुळे एकीकडे अनेकांना रोजगार गमवावा लागला असला तरी दुसरीकडे याच रोगाने रोजगाराचे काही नवे पर्यायदेखील सुचवले आहेत. याच पर्यायावर काम करत कोल्हापूर जिल्’ातील ३०५ बचतगटांनी सध्याच्या साथीच्या काळात सर्वाधिक मागणी असलेल्या साडेपाच लाख मुखपट्टय़ांची (मास्क) निर्मिती केली आहे. या सर्व उत्पादनाची कोल्हापूर जिल्हा परिषदेने खरेदी केली असून राज्यभर मागणीनुसार आता या मुखपट्टय़ा पाठवल्या जाणार आहेत.

करोनाच्या जगव्यापी साथीमुळे मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात आपल्याकडे टाळेबंदी लागू झाली आणि या आजाराबरोबरच सर्वत्र बेरोजगारी, आर्थिक अरिष्टाचीही चर्चा सुरू झाली. छोटे-मोठे अनेक व्यवसाय बंद झाले. असंघटित वर्गाचे रोजगार बुडाले. याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणाऱ्या वर्गास मोठय़ा प्रमाणात बसला. या वर्गातील बहुसंख्य महिला या अन्य रोजगाराबरोबरच बचतगटाच्या माध्यमातूनही अर्थार्जन करत असतात. परंतु टाळेबंदीमुळे त्यांच्याही व्यवसायावर गदा आली. परंतु दुसरीकडे करोनामुळेच रोजगाराचे काही नवे पर्यायदेखील सुचवले. याच पर्यायावर काम करत कोल्हापूर जिल्’ातील ३०५ बचतगटांनी सध्याच्या साथीच्या काळात सर्वाधिक मागणी असलेल्या मुखपट्टय़ांची (मास्क) निर्मिती सुरू केली. जिल्ह्यातील ३०५ समूहातील १३०१ महिलांनी गेल्या ६४ दिवसांत तब्बल  साडेपाच लाख मुखपट्टय़ांची निर्मिती केली आहे. ७१ लाख ३५ हजार रुपयांच्या या सर्व उत्पादनाची कोल्हापूर जिल्हा परिषदेने खरेदी केली आहे. या खरेदी केलेल्या मालाचे आता मागणीनुसार राज्यभर वितरण केले जाणार आहे.

या मुखपट्टीची खरेदी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केली आहे. बाजारापेक्षा अत्यंत कमी किमतीत पण दर्जेदार असणाऱ्या या मुखपट्टय़ांना राज्यातून मागणी येत आहे. करोनासारख्या महामारीच्या युध्दात शेकडो महिलांनी दिलेले योगदान आहे. तसेच यातून त्यांनी त्यांच्या कुटुंबालाही मोठा हातभार दिला आहे.

अमन मित्तल, मुख्य कार्यकारी आधिकारी, कोल्हापूर जिल्हा परिषद