News Flash

आता कोल्हापूर दर्शन केवळ महालक्ष्मी आणि राजवाडय़ापुरते!

सहलींच्या नव्या नियमावलीने पन्हाळा, आंबा, गगनबावडा राहिले दूर

कोल्हापुरात आले की करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन जुना-नवा राजवाडा व्हाया टाऊन हॉल पहायचा आणि तासा-दोन तासात कोल्हापूरला ‘गुड बाय’ करुन पुढच्या प्रवासाला निघायचे. असे काहीसे चित्र कोल्हापूर जिल्हयाच्या सहलीसाठी येणाऱ्या विद्यार्थी-शिक्षकांना पहावे लागणार आहे. कोल्हापूरचे खरे पर्यटन पन्हाळा, आंबा, गगनबावडा, राधानगरी या डोंगराळ भागात वसले आहे. सहयाद्रीच्या या पर्वतरांगांमध्ये सहल नेण्यास मज्जाव करण्याचा फतवा राज्यशासनाने काढला असल्याने कोल्हापुरात येणाऱ्या सहलींवर डोंगराएवढया समस्या निर्माण झाल्या आहेत.
मुरुड समुद्रकिनारी घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्याच्या शिक्षण विभागाने शैक्षणिक सहलींवर मर्यादा आणल्या आहेत. शिक्षण उपसंचालकांनी २७ कलमांचे परिपत्रक काढले असून त्यातील तपशील पाहता शैक्षणिक सहलींवर गंडांतर आले आहे. समुद्रकिनारा, नदी, तलाव, उंच टेकडी, पर्वत रांगा, वॉटर पार्क अशा सहलीचे आकर्षण असणाऱ्या ठिकाणी सहल नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यामुळे सहलींच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला गेला आहे. शिक्षण विभागाच्या सहलीबाबतच्या नव्या नियम अवलोकनी घेतल्यास कोल्हापूर जिल्हयात आगामी काळात शैक्षणिक सहली येण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटणार आहे. कोल्हापूरचे पर्यटन हे बहुतांश पर्वतराजीमध्ये आणि पाण्याच्या ठिकाणी असल्याने शैक्षणिक सहलीच्या संयोजकांना कोल्हापूरच्या नावावर लालफुली मारावी लागेल काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
कोल्हापुरात मुख्य आकर्षण असते ते करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या दर्शनाचे .त्यानंतर पावले वळतात ती जुना व नवा राजवाडा पाहण्यासाठी. याच मार्गावर असलेले टाऊन हॉल हे वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी सहली मोठया प्रमाणात येतात. पण दोन कि.मी. अंतरातील ही स्थळे पाहून झाली की कोल्हापुरातील सहलींना पूर्णविराम द्यावा लागणार आहे. एखादा रसिक शिक्षक असेल तर करवीरनगरीतील कलादालने विद्यार्थ्यांच्या नजरेत भरवेल. फार झाले तर कणेरी मठातील जुने गाव, संस्कृती तद्वत खिद्रापूरचे ऐतिहासिक कोपेश्वर मंदिर दाखविणेसाठी प्रयत्नही करेल. पण हे स्थलदर्शन झाले की कोल्हापूरचे सहलीचे पर्यटन नव्या नियमामुळे आवरते घ्यावे लागणार आहे.
कोल्हापूरचे पर्यटन म्हणजे एक फुल्ल पॅकेज आहे. धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, नसíगक इतकेच काय औद्योगिकदृष्टयाही कोल्हापूर जिल्हयात पाहण्यासारखे खूप कांही आहे. पन्हाळ-विशाळगडावरील उत्तमोत्तम ऐतिहासिक स्थळे, शेजारच्या डोंगरावरील दख्खनचा राजा जोतिबा, गगनबावडा, आंबा ही डोंगर रांगेतील निसर्गस्थळे, राधानगरीचे अभयारण्य यासह अनेक किल्ले-गड, धबधबे यांना मुकावे लागणार आहे. कोल्हापूरचा रंकाळा तलाव याच्या जोडीलाच नृसिंहवाडीतील श्री दत्त देवस्थान (शेजारी वाहणाऱ्या कृष्णा नदीत मगरींचा उपद्रव असल्याने) हेही यापुढे पाहता येणार नाही. अशी महत्त्वपूर्ण स्थळे वगळल्यास करवीर नगरीसह जिल्हयात पाहण्यासारखे फारसे कांही उरणार नसलेने अवघ्या कांही तासात परतीच्या मार्गास न लागल्यास नवल ते काय!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2016 3:30 am

Web Title: prohibition of state government for teachers and students trip
Next Stories
1 न्यायालयाच्या नूतन इमारतीची ‘लिफ्ट’ पहिल्याच दिवशी आजारी
2 इचलकरंजी शहरात राजरोसपणे वृक्षांची कत्तल
3 कोल्हापूर सराफ संघटनेचा उद्या सराफ बाजार बंद
Just Now!
X