दयानंद लिपारे

करोनोत्तर काळात होणारे बदल लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्य़ात नियोजन केले जात आहे. कोल्हापूरमध्ये माहिती तंत्रज्ञान (आयटी) उद्योग व्यापक प्रमाणामध्ये सुरू व्हावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. महापालिका क्षेत्रामध्ये तीन मोठे टॉवर बांधून सुमारे एक लाख चौरस मीटर बांधकाम आणि औद्योगिक वसाहतीत २०० एकर जागा आयटी पार्कसाठी मिळवण्यासाठी जिल्ह्य़ातील मंत्र्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यामुळे आयटी क्षेत्राला जिल्ह्य़ांत विस्तारण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा या क्षेत्रातील व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.

कोल्हापूरमध्ये आयटी क्षेत्र सुरू होण्यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरांतील अनेक संगणक पदवीधर मुंबई-पुण्यासह देशातील विविध क्षेत्रांमध्ये सेवा करीत आहेत. अनेकांनी स्वत:चे छोटे उद्योग ही सुरू केले आहेत. त्याचबरोबर आपल्या कोल्हापुरातही आयटी उद्योग सुरू करावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याकरिता आयटी उद्योजकांची संघटनाही स्थापन झाली आहे. कोल्हापूर हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास होण्यासाठी पोषक शहर आहे. मात्र या उद्योगाला चालना मिळण्यासाठी शासकीय पातळीवरून अपेक्षित सहकार्य मिळू शकलेले नाही.

तीन मोठय़ा इमारतींची उभारणी

कोल्हापुरात आयटी क्षेत्र सुरू करण्याची इच्छा अनेकांची इच्छा आहे. त्यासाठी समाजमाध्यमाद्वारे देशविदेशात संपर्क साधला जात आहे. काही कंपन्याही कोल्हापुरात येण्यास उत्सुक आहेत. मात्र जागेची गरज हा कळीचा मुद्दा आहे. याकरिता कोल्हापूर महापालिकेकडे प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापुरातील रस्ते प्रकल्प करणाऱ्या आयआरबी कंपनीला एक मोठा भूखंड दिला होता. कंपनीने गाशा गुंडाळला असल्याने तेथे पंचतारांकित हॉटेलचे सुरू असलेले बांधकामही ठप्प झाले आहे. या जागेमध्ये ‘आयटी’साठी तीन मोठे टॉवर उभा करण्याचा प्रस्ताव आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी आयटी उद्योजकांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक असणाऱ्या घटकांची यादी मागवली आहे. त्यातून आयटी उद्योजकांसाठी येथे इमारत बांधून दिली जाणार असल्याने जागेचा प्रश्न सुटणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे सुमारे ५० उद्योजकांनी एक लाख चौरस हजार मीटर जागेची नोंदणी केली आहे. त्यातील किमान निम्मी जागा तरी आयटी उद्योजक घेतील, असे आताचे चित्र असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

विकासाची संधी

कोल्हापुरात सध्या तीन एकर जागेत आयटी पार्क सुरू असले तरी ही जागा कमी पडत आहे. त्याचा विस्तार करण्यासाठी काही उद्योजक गेल्या १० वर्षांपासून शासन, प्रशासन, बडय़ा कंपन्या आदी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यातील आयटी उद्योजक ओंकार देशपांडे यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांनी सांगितले की, सध्या शासन, प्रशासन, मंत्री, उद्योजक, यांच्यात चांगला समन्वय निर्माण झाला आहे. जागा आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत आहे. कोल्हापुरात विमानसेवा तेजीत आहे. भौगोलिक वातावरण, प्रस्तावित इंडस्ट्रियल कॉरिडॉर सारे पूरक वातावरण कोल्हापुरातील आयटी उद्योजकांना आणखी बहरण्याची संधी देणारे आहे, असे देशपांडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

बडय़ा कंपन्यांसाठी प्रयत्न

कोल्हापुरात लहान व मध्यम आयटी कंपन्यांबरोबरच मोठय़ा कंपन्यांनी येथे उद्योग सुरू करावा अशा हालचाली गतिमान झाल्या आहेत. या संदर्भात ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये २०० एकर जागा ‘आयटी पार्क’साठी राखून ठेवावी अशी मागणी केली आहे. याबाबत हसन मुश्रीफ म्हणाले, ‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर विप्रो, इन्फोसिस यांसारख्या बडय़ा कंपन्यांनी कोल्हापुरात उद्योग सुरू करण्याची इच्छा दर्शवली असल्याचे सांगितले. त्यांच्यासाठी पुरेशी जागा मिळाली तर ते येथे उद्योग सुरू करण्यास तयार आहेत. त्यानुसार आम्ही पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत आयटी पार्कसाठी अधिकाधिक जागा मिळवत असून यातून मोठा उद्योग येथे सुरू होण्याच्या प्रयत्नांतून सकारात्मक बदल घडेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.