कोल्हापूर : भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींविषयी  अपशब्द उद्गारल्याच्या निषेधार्थ बुधवारी  कोल्हापुरातील विविध पक्ष , संघटनेच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. कदम यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपला मारो आंदोलन करत त्यांचा पुतळा जाळण्यात आला.

कदम यांनी मुलींबद्दल अपशब्द काढल्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या या विधानाच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी निषेध नोंदवण्यात येत आहे. आज कोल्हापुरातील कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने येथील  दाभोळकर कॉर्नर परिसरात कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या पुतळ्याला जोडय़ांचा प्रसाद देण्यात आला. तसेच संतप्त कार्यकर्त्यांनी राम कदम यांच्या पुतळ्याचे  दहन केले.

महिला काँग्रेस मध्ये वाद

आंदोलनासाठी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना दोन वाजण्याची वेळ देण्यात आली होती. तेव्हा काही निवडक महिला कार्यकर्त्यां पोहोचल्या. त्यांनी हे आंदोलन उरकून टाकले. उशिरा आलेल्या महिला शहराध्यक्ष आणि त्यांच्या गटातील महिलांना याचा चांगलाच राग आला. त्यांची आणि या महिला कार्यकर्त्यांंमध्ये काँग्रेस कमिटीच्या परिसरातच आंदोलनानंतर चांगलीच जुंपली. एकमेकींचा उद्धार करणारम्य़ा या कार्यकर्त्यांंचे भांडण सोडविताना पुरुष कार्यकर्त्यांचे  नाकीनऊ  आले. एकीकडे कोल्हापूर काँग्रेसमध्ये ऐक्य झाल्याचा दावा केला जात असताना या प्रकाराने या दाव्याला छेद गेला.

भारतीय महिला फेडरेशन

भारतीय महिला फेडरेशन व ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन यांच्यावतीने बिंदू चौक येथे आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. कदम यांच्या प्रतिमेस चपलांचा प्रसाद देण्यात आला. संघटनेच्या निमंत्रक प्रा. सुनीता अमृतसागर यांनी, प्रशांत परिचारक यांच्यानंतर आता राम कदम यांनी महिलांविषयी अवमानकारक विधान केले आहे, भाजपचे मनुवादी नेते अशी विधाने जाणीवपूर्वक करत असून त्याचा निषेध नोंदवत आहोत, असे सांगितले. सह निमंत्रक  स्नेहल कांबळे , प्रशांत आंबी यांनी कदम यांच्यावर टीका केली . उमा पानसरे, सुमन पाटील, आरती रेडेकर यांच्यासह कार्यकर्ते  सहभागी झाले होते.

इचलकरंजीत आंदोलनाचा फार्स

राज्यभर कदम यांच्याविरोधात तीव्र आंदोलन होत असताना इचलकरंजीत महिला काँग्रेसने उपचार म्हणून प्रांत कार्यालयात निवेदन दिले. काँग्रेसच्या प्रथेप्रमाणे आपले चेहरे व्यवस्थित दिसतील अशी छायाचित्रे माध्यमांकडे पाठवून प्रसिद्धीत कसे राहता येईल, याची काळजी घेऊ न एक आंदोलन अक्षरश: उरकले.