24 January 2020

News Flash

पुणे-बेंगळुरू महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी बंद

येथील राष्ट्रीय महामार्गावर मैलोनमैल महापुराचे अस्ताव्यस्त पसरलेले पाणीच पाणी दिसत आहे

रस्त्यावर तब्बल ६ फुटांपर्यंत पाणी

कोल्हापूर : धुवाधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अभूतपूर्व पूरस्थितीमुळे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग बुधवारीही बंद राहिला. कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील पुलावर तब्बल सहा फूट पाणी असल्याने या राष्ट्रीय महामार्गावरील कर्नाटक, गोवा राज्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली होती. तर, कोकणात उतरणाऱ्या घाटांवर  दरडी कोसळण्याचे आणि रस्त्यांना भेग पाडण्याचे प्रकार होत असल्याने कोकणाचा मार्गही दुरापास्त झाला आहे.

आठवडाभर अखंडित कोसळणाऱ्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्याची पुरती कोंडी केली आहे. जिल्ह्याच्या सर्व भागात महापुराचे पाणी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आणि शहरात प्रवेश करणे कठीण झाले आहे. पंचगंगा नदी धोकापातळीपेक्षा १३ फूट अधिक उंचीने वाहत आहे. परिणामी, राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदीचा जुना पूल तीन दिवसांपूर्वी पाण्याखाली गेला आहे. तर, नवा पूल कालपासून वाहतुकीसाठी  बंद केला आहे. काल पुलावर चार फूट पाणी होते, बुधवारी ते सहा फूट होते. पाण्याला उतार मिळत नसल्याने पाणीपातळी वाढतच चालली आहे.

येथील राष्ट्रीय महामार्गावर मैलोनमैल महापुराचे अस्ताव्यस्त पसरलेले पाणीच पाणी दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी दक्षिण दिशेला होणारी कर्नाटक, गोवा, केरळ राज्याची तसेच उत्तर भागाला कराडपासून पुणे, मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. एस. टी., खासगी बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आजूबाजूच्या हॉटेलमध्ये तसेच ग्रामीण भागातील आसरा केंद्रात मदतीसाठी धाव घेतली आहे. कोल्हापूपर्यंत आलेल्या या वाहनांना पुढे-मागे जाता येत नसल्याने त्यांची मोठी कोंडी झाली आहे. प्रवासी दोन दिवसांपासून अडकून पडलेले आहेत. पुराचे पाणी कमी झाल्यावर एकेरी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात येईल असे आज प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले असून कोकण, कर्नाटकात जाण्यासाठी अन्य मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

First Published on August 8, 2019 2:07 am

Web Title: pune bangalore highway closed for second day zws 70
Next Stories
1 कोल्हापुरात महापुराची तीव्रता वाढली; मदतकार्याला जोर
2 कोल्हापूर, सांगलीत पावसाचा कहर, बचावकार्य सुरु असताना बोट उलटली
3 सांगली, कोल्हापुरात महापूर
Just Now!
X