|| दयानंद लिपारे

देशाच्या दळणवळण क्षेत्रात महत्त्वपूर्ण मानला जाणारा पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूरजवळ गेली पाच दिवस पाण्याखाली बुडाला आहे. यामुळे उत्तर भारतातून दक्षिण भारतातील राज्यांकडे होणारी माल, प्रवासी वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. वाहन व्यवसायाला प्रचंड प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. कोल्हापूर परिसरात सुमारे हजारभर तर पुणे-बेळगाव या मार्गावर सुमारे पाच हजार ट्रक, प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक परिवहन महामंडळाच्या गाडय़ांची चाके थांबली आहेत. यातील प्रवासी, चालक, वाहक यांची मोठी गैरसोय झाली असली, तरी कोल्हापूर परिसरातून मदतीचे हजारो हात पुढे आल्याने संकटकाळात त्यांचे एकाकीपण दूर होऊन भावनिक, मानसिक आणि बंधुत्वाचा आधार मिळाला आहे.

महापुराच्या तडाख्याचा फटका कोल्हापूरपासून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांना आणि त्यातील प्रवाशांना बसला आहे. वारणेचा फुगवटा किणी टोल नाक्यावर आल्याने दोन दिवस वाहतूक होऊ  शकली नाही . तेथील वाहने शिरोलीपर्यंत येऊ  शकतात. पण कोल्हापूर जवळील शिरोली येथे पंचगंगा नदीचे पाणी महामार्गावर आठ फुटापर्यंत वाढले होते. याचे कारण या मार्गावर पंचगंगा नदी वाहते. नदीवर पूल आहे. जुन्या पुलावरील रस्ता सोमवारी रात्रीच पाण्याखाली गेला होता. तर मंगळवारी रात्री राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता पाण्यात बुडाला. नदीचे पाणी ओसरत आहे, अजूनही महामार्गावर चार फूट पाणी असल्याने वाहतूक ठप्प आहे. राष्ट्रीय महामार्ग बंद असल्याने प्रवासी, वाहक, चालकांची गैरसोय होत आहे. गेले पाच दिवस पुणे-बंगळुरु महामार्गावर सर्वप्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद आहे. मोटार, ट्रक आणि कंटेनर चालक अडकून पडले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग तब्बल पाच दिवसांपासून अजूनही बंद आहे. कोल्हापूर शहर नजरेच्या टप्प्यात आहे, पण नदीच्या पल्याड पाच दिवस कोंडीत सापडलेल्या प्रवाशांची मानसिकता खचत आहे. बस, मोटारीतून प्रवास करणारे पाचशेवर प्रवासी शिरोली मदरसा, हालोंडी गावातील सभागृह येथे सुरक्षितस्थळी आहेत. तेथे प्रवासी, चालक, वाहक यांना चहा, नाश्ता, भोजन, औषधे, कपडे अशी सगळ्याप्रकाराची सोय करण्यासाठी शिरोली, नागाव, हालोंडी, शिये भागातील तरुण, सामाजिक कार्यकर्ते तत्पर आहेत. ‘प्रवाशांना कशाचीही उणीव नसली, तरी घरी जाण्याची ओढ कायम असल्याने डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून देण्याशिवाय पर्याय नाही. शिरोली ते किणी टोल नाका या भागातील हजारावर ट्रक, बसगाडय़ा चालक, वाहकांना भेटून त्यांना मदत करीत आहोत,’ असे शिये येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल करणे यांनी शनिवारी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

कोल्हापूरवर बेहद्द खूश

मुसळधार पावसामुळे महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अशावेळी राज्यातील-परराज्यातील चालक वाहकांना कशाचीही ददात पडणार नाही याची काटेकोर काळजी सामाजिक कार्यकर्ते घेत आहेत. संकटाची छाया असताना मायेची सावली मिळाल्याने ही मंडळी कोल्हापुरी पाहुणचारावर बेहद्द खूश आहेत. ‘आम्ही हरियाणातच नव्हे तर देशभर गेलो तरी कोल्हापूरचे प्रेम, मदत कशी अमूल्य असते हे सांगत राहू,’ अशी भावनात्मक प्रतिRि या एका वाहनचालकाने व्यक्त केली.

लुटारू प्रवृत्ती

कोल्हापूर परिसरात अडकून पडलेल्या प्रवासी, चालक, वाहकांना मदत केली जात असताना कर्नाटकातील निपाणीजवळील तवंदी घाटाजवळ दुप्पट, तिप्पट दर आकारून खाद्यपदार्थ विकून आर्थिक लुबाडणूक करण्यात येत आहे. या प्रवृत्तीवर समाज माध्यमातून कोरडे ओढले जात आहे.

कोटय़वधीचे आर्थिक नुकसान

पुणे-बंगळुरु हा देशातील चार R मांकाचा महामार्ग आहे. या मार्गावरून दररोज वेगवेगळ्या प्रकारची लाखो वाहने प्रवास करीत असतात. आता वाहतूक ठप्प झाल्याने टोल आकारणी, हॉटेल, पेट्रोल पंप, प्रवासी, माल वाहतूक अशा नानाविध प्रकारचे व्यवहार बंद झाले आहेत. आठवडय़ात कोल्हापूर भागात कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. काही हॉटेल, लॉज यांची मात्र या काळात बरकत झाली आहे.