कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शिरोली भागात पुणे-बंगळूरू महामार्ग पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

कोल्हापूरात जवळपास ३० वर्षांपूर्वीचा विक्रम पावसाने मोडला आहे. तीसवर्षांपूर्वी पंचगंगा ५० फुटांच्यावरुन वाहत होती. त्यानंतर यावर्षी पंचगंगेने पान्नास फुटांची पातळी गाठली आहे. त्यामुळे कोल्हापूरजवळून जाणारा पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे. यावरुन पुण्याच्या दिशेने आणि बंगळूरूच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. शिरोली पुलाच्या कोल्हापूरच्या बाजूने पाणी आल्याने कोल्हापूरातील प्रवेश मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. शहरातील कुठल्याच भागातून शिरोली भागात जाता येत नाही.

गगनबाडवा, राधानगरी आणि गारगोटी भागातूनही कोल्हापूरात प्रवेश बंद झाला आहे. तसेच १०७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे छोटे-मोठे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी कोणत्याही परिस्थितीत धोका पत्करून वाहतूक करु नये. पुढील दोन ते तीन दिवस कोल्हापूरातील शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे.

पपिंग हाऊसही पाण्याखाली गेल्याने शहराला होणारा शुद्ध पाण्याचा पुरवठाही बंद झाला आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवस पाणी पुरवठा होणार नाही असेही प्रशासनाने कळवले आहे. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरायचे आवाहनही कोल्हापूरकरांना करण्यात आले आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापनाने अनेक नागरी भागात जाऊन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.