दोन महिने रुसलेल्या वरुणराजाने बुधवारी कोल्हापूर शहर व जिल्ह्यात सर्वदूर जोरदार हजेरी लावल्याने दुष्काळाची छाया जाणवू लागलेल्या कोल्हापूर जिल्ह्याला चांगलाच जलदिलासा मिळाला आहे. ऐन पावसाळ्यात उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने चांगलाच गारवा मिळाला असून पिकांनाही तो उपयुक्त ठरला आहे. श्रावणाच्या अखेरीस श्रावणसरींचे दर्शन घडल्याने शेतकरी वर्गालाही दिलासा मिळाला असून बाप्पांच्या मुक्कामापर्यंत पावसानेही हजेरी लावावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यंदा मौसमात पावसाने जूनच्या पहिल्या आठवडय़ात समाधानकारक हजेरी लावली होती. त्यामुळे जिल्ह्यातील चार धरणे शंभर टक्के भरली. खरीप हंगमातील पिकांनाही यामुळे चांगला दिलासा मिळाला होता. पण जूनच्या पंधरवडय़ानंतर पावसाने दडी मारली. यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला होता.
गेल्या आठवडय़ापासून वातावरणातील तापमानाने ३६ अंशांचा पारा ओलांडला होता. ऐन पावसाळ्यात कडक उन्हाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत होत्या. सकाळपासून आकाशात ढग दाटून आले होते, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शहरात पावसाने जोरदार हजेरील लावली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत पावसाच्या हलक्या सरी सुरूच होत्या. शहरातील विविध ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहनधारकांना कसरत करत मार्ग काढावा लागत होता. या पासवसाने भात, सोयाबीन, भुईमूग या मान टाकू लागलेल्या पिकांना संजीवनी दिल्याने बळिराजा आनंदित झाला आहे. तर धरण, नदी येथील पाणीसाठय़ात किंचितशी वाढ झाल्याने धास्तावलेले प्रशासन काहीसे सुखावले आहे.